देश की सुरीली धडकन असलेली ‘विविध भारती’ ही बेळगाववासियांना आकाशवाणी धारवाड केंद्रातून FM 103 या सिग्नलवर ऐकू येणारी राष्ट्रीय प्रसारण सेवा अचानक कांही दिवसापासून बंद झाली असून सिग्नलवर निव्वळ ‘कन्नड’ प्रसारण होत असल्यामुळे श्रोत्यांमध्ये आश्चर्यासह तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा नक्की काय गोंधळ आहे? असा सवालही केला जात आहे.
रेडिओ ऐकणारा श्रोतावर्ग आजही बेळगावात आहे. आज मोबाईल, युट्युब फेसबुक यांचे प्रस्थ वाढले आहे. परंतु जेंव्हा ही सर्व प्रसार माध्यमे अजून उदयाला यावयाची होती
तेंव्हापासून आकाशवाणीने श्रोतू रसिकांना मनापासून सेवा दिली आहे. उत्तमोत्तम नाटिका, श्रुतिका आकाशवाणीने दिल्या. याशिवाय आकाशवाणीतर्फे दिल्या जाणार्या बातम्या बिनचूक असत. तसेच कृषी विषयक मार्गदर्शन आकाशवाणीकडून केले जात असते.
आकाशवाणी धारवाड केंद्रातून FM 103 या सिग्नलवर पूर्णपणे कन्नड प्रसारण सुरू झाल्यामुळे आज बेळगावातील आकाशवाणीचे श्रोते ‘विविध भारती’ला मुकले आहेत. प्रसारमाध्यमांचे प्रस्थ वाढले असले तरी आजही समाजातील एक वर्ग आवर्जून रेडिओ ऐकतो आणि त्यांच्यासाठी तरी आकाशवाणीने आपली सेवा बंद करू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिवाय ही राष्ट्रीय प्रसारण सेवा आहे ती अशी अचानक कशी काय बंद होते? याबाबत आश्चर्य व्यक्त करून हा कन्नड सक्तीचा तर भाग नाही ना? असा संशय इतर भाषिक श्रोत्यांमध्ये व्यक्त होत आहे.