बेळगावचा आघाडीचा धावपटू विश्वंभर लक्ष्मण कोलेकर याने कोलकता येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ऑल इंडिया रेल्वे ॲथलेटिक चॅम्पियनशिप या क्रीडा महोत्सवात चमकदार कामगिरी नोंदविताना घवघवीत यश संपादन केले आहे.
कोलकता येथील ऑल इंडिया रेल्वे ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय रेल्वे खात्याचे देशभरातील अव्वल क्रीडापटूंचा सहभाग होता.
सदर स्पर्धेत नैऋत्य रेल्वे बेंगलोरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विश्वंभर याने पुरुषांच्या वैयक्तिक 800 मी. आणि 1500 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये पहिल्या फेरीपासूनच चमकदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक हस्तगत केले. याव्यतिरिक्त सांघिक प्रकारांमध्ये 4×400 मी. रिले शर्यतीमध्ये त्याने स्वतःसह संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.
विश्वंभर कोळेकर हा गेल्या 10 वर्षापासून नैऋत्य रेल्वे बेंगलोर येथे कार्यरत आहे. आजतागायत धावण्याच्या शर्यतीमध्ये त्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवली आहेत. विश्वंभर याला रेल्वेच्या क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि वडील लक्ष्मण कोलेकर यांचे प्रोत्साहन लागत आहे.