शिक्षण खात्याने राज्यातील शाळांमध्ये 15000 जागांवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यासाठी एकूण 1956 जागा मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.
शिक्षक भरतीसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला 685 आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याला 1271 जागा मंजूर झाले आहेत. राज्यात सर्वाधिक जागा बेळगाव जिल्ह्याला तर सर्वात कमी 128 जागा मंगळूर जिल्ह्याला मंजूर झाल्या आहेत. तसेच राज्यात सर्वाधिक जागा गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांच्या भरती केल्या जाणार आहेत.
राज्यातील 15 हजार जागांपैकी 5 हजार जागा कल्याण कर्नाटकमधील सात जिल्ह्यांसाठी मंजूर झाल्या आहेत. उर्वरित जागांवर राज्यातील इतर शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरती केली जाणार आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. इंग्रजी -1250, गणित विज्ञान -4500, समाज विज्ञान -2750, जीवशास्त्र -1500 या पद्धतीने एकूण 10 हजार जागा.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या 685 जागांपैकी 118 जागांवर इंग्रजी, 196 जागांवर गणित, 309 जागांवर समाज विज्ञान आणि 52 जागांवर जीवशास्त्र विषयाच्या शिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. याचपद्धतीने चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातसाठी मंजूर झालेल्या 1271 जागांपैकी 132 जागांवर इंग्रजी, 375 जागांवर गणित, 550 जागांवर समाज विज्ञान आणि 214 जागांवर जीवशास्त्र विषयाच्या शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.
सदर शिक्षक भरतीसाठी येत्या 21 व 22 मे रोजी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या सीईटी परीक्षेसाठी येत्या बुधवार दि. 23 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पदवीधरांना लाभ होणार आहे. यावेळी टीईटी पास झालेल्या पदवीधर शिक्षकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. परीक्षार्थींनी शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे शिक्षण खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.