रस्ता ओलांडताना कार गाडीने धडक दिल्याने 7 वर्षाच्या शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना काल कणबर्गी रोडवर घडली.
अब्दुल मन्नान मोहम्मद आसिफ बागलकोटी (वय 7) असे अपघातात मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे. शाळेवरून घरी परतणारा अब्दुल कणबर्गी क्रॉसनजीक रस्ता ओलांडत असताना त्याला कारने जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अब्दुलचा उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला.
सदर रस्त्यावर शाळेनजीक फक्त एकच गतिरोधक असल्यामुळेच हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
सदर ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला गतिरोधक बसविल्यास या रस्त्यावरून नेहमी ये-जा करणाऱ्या लहान शाळकरी मुलांच्या जीविताच्या दृष्टीने हितावह ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्यावर दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.