महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्री राजेश तुडयेकर यांना आज मुंबई येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुंबई येथील गऊ भारत भारती गोरक्षक सेवा ट्रस्टतर्फे आज शनिवारी सकाळी सातवा वर्धापन दिन आणि राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राजभवनामध्ये आयोजित या दिमाखदार सोहळ्यामध्ये बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्री राजेश तुडयेकर यांना राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कारा दाखल स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य आयोजक संजय अम्मन, चित्रपट लेखक व निर्माते विकास कपूर, तरुण फाउंडेशनचे अध्यक्ष तरुण राठी आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल एकूण 16 जणांना राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.
राजश्री तुडयेकर या मूळच्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या असून लग्नानंतर त्या बेळगाववासीय झाल्या आहेत. बेळगावातील त्यांचे सासरचे मूळ घर कोनवाळ गल्लीत असून सध्या त्या रिसालदार गल्लीत राहतात. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे लग्नापूर्वी म्हणजे सुमारे 17 वर्षापासून राजश्री सामाजिक क्षेत्रात क्रियाशील झाल्या. इस्लामपूर येथे त्यांनी अंध व मूकबधिर मुलांसाठी कार्य केले आहे. राजश्री तुडयेकर यांनी पुण्यातील 40 आदिवासी कुटुंबांना दत्तक घेतले असून या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबरोबरच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.
बेळगावमध्ये देखील विविध सामाजिक कार्यात राजश्री या नेहमी आघाडीवर असतात. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाउनच्या काळात राबविण्यात आलेल्या अन्न वाटप, मास्क वाटप आदी उपक्रमांमध्ये त्या अग्रेसर होत्या. तत्पूर्वी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या समवेत विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप, मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आदी उपक्रमात त्यांचा सहभाग होता. बेळगावातील कांही रुग्णांना शिवसेनेच्या रुग्णवाहिकेतून तातडीने मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल करण्यात आले होते. या कार्यात रुग्णवाहिका जरी शिवसेनेची असली तरी रुग्णांचे नातेवाईकांसाठी आलेला खर्च राजश्री आणि त्यांचे पती राजेश तुडयेकर यांनी उचलला होता.
राजेश हे बेळगाव शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत. सामाजिक कार्याबरोबरच राजश्री तुडयेकर मार्केटिंग क्षेत्रात देखील अग्रेसर आहेत. गेल्याच वर्षी या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले होते. एफएक्स मार्केटच्या त्या देशातील पहिल्या महिला आहेत आणि ज्यांनी चक्क दुबईमध्ये स्वतःचे ब्रोकर हाऊस सुरू केले आहे हे विशेष होय. सामाजिक कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते गौरविले गेल्याबद्दल राजश्री राजेश तुडयेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.