बेळगाव राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य खात्याचे मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्यावर एक गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत चक्क पंतप्रधान आणि केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज्य मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
गेल्या सुमारे एक वर्षापासून बाकी असलेल्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी मंत्री ईश्वराप्पा आणि त्यांचे सहकारी कमिशनची मागणी करून आपल्याला त्रास देत आहेत, असा आरोप बेळगावचे कंत्राटदार संतोष के. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री (आरडीपीआर) गिरीराज सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे.
तथापि मंत्री ईश्वराप्पा यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे. संबंधित कंत्राटदार खोटे बोलत असून आपण त्याला (संतोष पाटील) ओळखतच नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. माझ्यावरील या आरोपाची माहिती मिळताच मी तात्काळ प्रकरण दाखल केले असून लवकरच त्या कंत्राटदाराला नोटीस जारी केली जाईल. असेही त्यांनी सांगितले. मात्र कोणत्या न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे? आणि कोणत्या आरोपावरून हे प्रकरण दाखल केले आहे? याचा उलगडा मात्र मंत्री ईश्वराप्पा यांनी केला नाही.
दरम्यान बेळगाव येथील ठेकेदाराकडून कमिशन मागणाऱ्या मंत्री ईश्वराप्पा राजीनामा द्यावा अशी मागणी बेळगाव आम आदमी पक्षाने केला आहे.बेळगाव आप चे राजू टोपणणावर यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.