बाची (ता. जि. बेळगाव) गावातील प्राथमिक शाळेसमोर विकास काम राबविण्यासाठी गेल्या 3 महिन्यापासून टाकण्यात आलेल्या मातीमुळे परिसरात दलदल आणि अस्वच्छता निर्माण झाल्याने पालकवर्गासह नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बाची गावातील प्राथमिक शाळेसमोरील मैदानावर पेव्हर्स बसविण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी गेल्या तीन महिन्यापूर्वी शाळेच्या आवारात ठिकाणी माती आणून टाकण्यात आली आहे. तथापि पेव्हर्स बसविण्याचे काम अद्यापपर्यंत हाती घेण्यात आलेले नाही. परिणामी तीन महिन्याच्या कालावधीत मातीच्या ढिगार्यातील माती इतस्ततः पसरली आहे.
या मातीच्या ढिगार्यात नजीकच मुलांचा माध्यान्ह आहार बनवण्याची थोडी आहे त्यामुळे याठिकाणी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यामुळे चिखलाच्या दलदलीसह पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत. या साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू सारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
याखेरीज मातीमुळे शाळा आवारात धुळीचे प्रमाण वाढले असून या धुळीमध्येच माध्यान्ह आहार योजना राबविली जात आहे. या सर्व प्रकारांमुळे शाळेतील मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याखेरीज शाळा आवाराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
तरी मुख्याध्यापक आणि शाळा सुधारणा कमिटीच्या सदस्यांसह संबंधित अधिकारी तसेच ग्रामपंचायतीने याची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच संबंधित कंत्राटदाराकडून पेव्हर्स बसविण्याचे काम युद्धपातळीवर करून घेण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.