पूर्वापार रितीरिवाज पाळणाऱ्या आणि 18 गल्ल्यांचे सरपंचपद भूषविणाऱ्या मानाच्या चव्हाट गल्ली येथे शिमगोत्सव अर्थात होळीच्या पार्श्वभूमीवर काल बुधवारी रात्री होळीचा गाडा सजावट करून सुसज्ज करण्यात आला.
शहरातील चव्हाट गल्ली येथे गेल्या कित्येक वर्षापासून होळीचा सण पूर्वापार परंपरेनुसार भक्तिभावाने साजरा केला जातो. पिढ्या बदलल्या मात्र या गल्लीतील युवा पिढीचा पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्याचा जोष अद्यापही तसाच आहे.
चव्हाट गल्ली ही बहुदा शहरातील एकमेव अशी गल्ली आहे ज्या ठिकाणी होळीची पूर्वापार परंपरा अद्यापही टिकून आहे हे विशेष होय. पारंपारिक पद्धतीने होळी कामाण्णा आणणे आणि उभा करणे हे फक्त 18 गल्ल्यांचे सरपंचपद भूषविणाऱ्या चव्हाट गल्ली येथेच पहावयास मिळते.
यंदा देखील या गल्लीतील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवापिढीने होळीची पूर्वापार परंपरा कायम राखली आहे. त्या अनुषंगाने होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे काल बुधवारी रात्री सर्व मुले -युवक एकत्र आले आणि त्यांनी होळी आणण्यासाठी वापरला जाणारा गाडा सुसज्ज केला.
सर्वांनी गाड्याची रंगरंगोटी करून मोठ्या दोराने गाडा सुशोभित केला. हा दोर मोठी होळी ओढण्यासाठी वापरला जातो. गाडा सजून सुसज्ज करण्याची ही सर्व तयारी परंपरेनुसार सरपंच महादेवराव मोहिते यांच्या घरासमोर केली गेली. या गाड्यांमध्ये होळीसाठी लागणारी लाकडे भरली जातात.
आता आजच्या होळीच्या दिवशी दुपारी 4 वाजता गल्लीतील सर्वजण पुन्हा एकत्र येणार असून त्यानंतर बैलगाडीच्या जोताने लाकडे भरलेला गाडा किल्ल्यामध्ये नेण्यात येणार आहे. त्यानंतर किल्ल्यात पूजन केलेली होळी आणली जाणार आहे. एकंदर महत्त्वाची गोष्ट ही की, जग जरी कितीही पुढे गेलेले असले, प्रगत झालेले असले तरी चव्हाट गल्ली येथे मात्र पारंपारिक रीतीरिवाज अद्यापही पाळले जातात आणि यासाठी शहरात चव्हाट गल्लीचे महत्त्व मोठे आहे.