आर्ट्स सर्कलने आयोजित केलेल्या शास्त्रीय सहगायनाच्या कार्यक्रमाच्या कलाकार होत्या ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत. अध्यक्षा लता कित्तूर ह्यांनी सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ आणि स्मरणिका देऊन स्वागत केले. कलाकारांचा थोडक्यात परिचय रोहिणी गणपुले ह्यांनी करून दिला.
कार्यक्रमाची सुरुवात झाली सायंकालीन राग मुलतानीने. त्यामध्ये “हा रे मन काहे को सोचकर” हा विलंबित तीनतालातील ख़्याल आणि आडा चौतालातील “कवन देस कवन नगरिया में” द्रुत बंदिश कलाकारांनी सादर केली.
त्यानंतर त्यांनी “हिंडोल गावत सब” ही एक रागमाला सादर केली. ही रागमाला एकतालात बांधलेली होती. मध्यंतराआधी दीपिका ह्यांनी एक दादरा सादर केला. त्याचे बोल होते “कान्हा डार गयो मोपे रंग की गगरिया॥”
मध्यंतरानंतर ऋतुजा आणि दीपिका ह्यांनी राग केदार सादर केला. मध्यलय झपतालातील “मालनिया सज रही हारवा” ही बंदिश आणि त्यानंतर “नवेली नार” ही द्रुत एकतालातील बंदिश सादर केली. केदारानतर ऋतुजा लाड ह्यांनी एक होरी सादर केली. तिचे शब्द होते “सकल बृज धूम मची हा रे” . कार्यक्रमाची सांगता विदुषी अश्विनी भिडे देशपांडे ह्यांनी रचलेल्या “तुज पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी” ह्या भैरवीतील अभंगाने झाली.
दोन्ही कलाकारांना महेश देसाई ह्यांनी तबल्यावर आणि रवींद्र माने ह्यांनी संवादिनीवर उत्कृष्ट अशी साथ दिली. रोहिणी गणपुले ह्यांनी सर्वांचे आभार मानले.