उडुपी येथे हिजाब वरून सुरु झालेला वाद राज्यासह देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून विविध भागांमध्ये या विषयावर पडसाद उमटत आहेत.
काही ठिकाणी आंदोलन, काही ठिकाणी निषेध मोर्चा तर काही ठिकाणी हिजाब परिधान करून वर्गात हजेरी लावण्याचा अट्टहास करत शाळा-महाविद्यालय प्रशासनाशी हुज्जत घालणाऱ्या विद्यार्थिनी आणि पालकवर्ग…. इतकेच नाही तर हिजाब वरून सुरु झालेल्या वादामुळे विद्यार्थिनींनी काही भागात परीक्षांवर देखील बहिष्कार घातला आहे.
यानंतर आता बेळगावमध्ये एका मुस्लिम समाजाच्या सामाजिक कार्यकर्तीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती उजेडात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि सीमा इनामदार नामक समाजकार्य करणाऱ्या महिलेला अनोळखी व्यक्तीने वॉट्सऍप कॉलच्या माध्यमातून फोन कॉल करून हिजाब प्रकरणी धमकी दिली आहे. हिजाब आणि आझादी यासारख्या विषयांचे समर्थन केल्याने आपल्याला धमकी देण्यात आली आहे.
शिवाय फोन कॉल वर आपल्यासोबत अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यात आली असून यासंदर्भात सीईएन क्राईम विभागात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. हिजाब आणि आझादी याचे जाहीरपणे समर्थन करण्यात आल्याने आपल्याला धमकी देण्यात आली असल्याचा आरोप सीमा इनामदार यांनी केला आहे.
याबाबत मार्केट पोलीस स्थानकात अधिक तपासासाठी तक्रार वर्ग करण्यात आली असून इम्रान पिरजादे यांनी बोलताना सांगितले कि काल रात्री वीरभद्रनगर येथे काही युवक आपल्याला संशयास्पद रित्या आढळून आले आहेत. त्यांनीच हे कृत्य केल्याचा संशय असून पोलीस विभागाने याचा तपस घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हिजाब प्रकरणावरून राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये राजकीय संघटनांचा हात असल्याचा आरोप प्रत्येक राजकारण्यांकडून करण्यात येत आहे. मात्र या साऱ्या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी एकमेव प्राधान्य असणे गरजेचे होते. मात्र विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरून दिवसेंदिवस हिजाब प्रकरण चिघळण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे प्रकरण तातडीने शांत व्हावे शिवाय न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे हि अत्यावश्यक बाब आहे.