Sunday, April 28, 2024

/

*गांजा प्रकरणी पोलिसांसमोर आव्हान*

 belgaum

बेळगावमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी गांजा विक्री, गांजा तस्करी करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश करण्यात येत होता. एका पाठोपाठ एक नवनव्या ठिकाणी होत असलेल्या गांजा प्रकरणांचा छडा लावण्यात पोलीस विभागाला यश येत होते. मात्र बेंगळूर मध्ये शिवमूर्ती विटंबना प्रकरण झाल्यानंतर बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला.

यादरम्यान बेळगावमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरु झाले. मात्र यानंतर बेळगावमधील गांजा प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे निदर्शनास येत आहे.

बेळगावमधील गांधीनगर परिसरात नुकतेच एक प्रकरण समोर आले असून तरुण युवकांसह शालेय विद्यार्थीही गांजा आणि अंमली पदार्थाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शहर, उपनगर आणि आसपासच्या परिसरात हल्ली गांजाविक्री, तस्करीची प्रकरणे वाढत चालली असून याला आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

 belgaum

गांजा आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले तरुण अंमली पदार्थाच्या नशेच्या अनेक विचित्र कृत्य करताना निदर्शनास येत आहेत. अंमली पदार्थांची विक्री हा कायद्याने गुन्हा असल्याने पोलीस यंत्रणा याबाबत कडक कारवाई करत असल्याचा दावाही करते. मात्र बेळगावमध्ये होते असलेली आणि वाढत चाललेली प्रकरणे वेगळ्याच दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

Dcp gadadi

बेळगाव शहरात अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून हा प्रकार दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे जाळेही अधिकाधिक वाढत चालले आहे. गांधीनगर परिसरात आणि उज्वलनगर, न्यू आझमनगर, आझादनगर, गांधीनगर भागातील तरुण व शालेय विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अशातच नशेत असलेल्या तरुणांकडून महिलांची छेडछाड, अश्लील चाळे करणे, नशेत स्थानिकांना त्रास देणे, गोंधळ घालणे, यादरम्यान वादावादी, मारामारीचे प्रकार घडत असून गांधीनगर परिसरात अशाच एका गांजाच्या नशेत तरुणांनी एका युवकावर ब्लेडने हल्ला केल्याचीही घटना घडली आहे.

बेळगावमध्ये सुरु असलेल्या या साऱ्या प्रकाराला आळा घालावा, आणि अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी नागरिक पोलीस विभागाकडे करत आहेत. गांधीनगर येथे घडलेल्या प्रकाराबाबत गांधीनगर परिसरात महिलांनी निदर्शने करत निषेध देखील नोंदविला आहे.

शिवाय या साऱ्या प्रकाराला पोलिसांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. बेळगावच्या शांततेचे याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले असून आता गांजा प्रकरणी पोलिसांना कंबर कसावी लागणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.