राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी चेकपोस्टच्या ठिकाणी एका बसमधील बनावट आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 12 प्रवाशांवर निपाणी पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर कर्नाटकातील प्रवेशासाठी आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे.
यासाठी जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टच्या ठिकाणी कडक तपासणी केली जात असली तरी ही तपासणी चुकून आडमार्गाने कर्नाटकातील प्रवेशाचा प्रयत्न करण्याचे प्रकार घडत असतात.
यात भर म्हणून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आता बनावट आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्राचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. निपाणीनजीक राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी चेक पोस्टच्या ठिकाणी आज पहाटे चार वाजता नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवासी वाहनातील प्रवाशांची कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र तपासणी केली जात होती.
त्यावेळी निपाणी पोलिसांना एका खाजगी बस मधील 12 प्रवाशांकडे बनावट आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्रे आढळून आली. परिणामी त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान काल बुधवारी महाराष्ट्रात नव्याने 15,252 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कर्नाटकात काल त्यांची संख्या 16,436 इतकी होती.