कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये प्रचंड मोठा फरक आहे हे ध्यानात घेऊन निर्बंध लागू करण्यापूर्वी पॉझिटिव्हिटी रेट पाहण्यापेक्षा हॉस्पिटलायझेशनचा विचार करावा असा सल्ला तज्ञांच्या समितीने गोवा राज्य सरकारला दिला आहे, अशी माहिती राज्याच्या तज्ञ सल्लागार समितीचे सदस्य डाॅ. शेखर साळकर यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये प्रचंड फरक आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसंदर्भात निर्बंध लागू करताना पॉझिटिव्हिटी रेटचा विचार न करता हॉस्पिटलायझेशन अर्थात हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्ण संख्येचा विचार केला जावा, असे तज्ञांच्या समितीने राज्य सरकारला सुचविले आहे.
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या 10 टक्क्यावर असेल तर क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीचा निर्बंध लागू केला जावा.
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमधील बाधित रुग्णांची टक्केवारी 40 च्या वर गेल्यास पुढील निर्बंध लागू केले जावेत. जर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं, जिल्हा हॉस्पिटल्स आदी ठिकाणी 50 टक्क्याहून अधिक बाधित रुग्ण दाखल होत असल्याचे निदर्शनास आल्यास गोवा सरकार राज्यात लॉक डाऊनचा आदेश जारी करू शकते, असेही डॉ शेखर साळकर यांनी स्पष्ट केले.