विकेंडर लॉकडाउनच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कर्फ्यू च्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत यांचा प्रकार शहरातील जय किसान होलसेल खाजगी भाजी मार्केटमध्ये पहावयास मिळाला. या ठिकाणी भाजी खरेदी विक्रीसाठी कोरोना नियम पायदळी तुडवून एकच झुंबड उडाली होती.
बेळगाव शहराच्या बाहेरील बाजूस गांधीनगर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 शेजारी नुकत्याच उद्घाटन झालेल्या जय किसान होलसेल खाजगी भाजी मार्केटमध्ये आज सामाजिक आंतर, फेसमास्क आदी नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू होते.
खरेदी आणि विक्रीसाठी आलेल्या व्यापारी, एजंट व शेतकऱ्यांच्या प्रचंड गर्दीमुळे या मार्केटला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सदर भाजी मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातून दररोज असंख्य व्यापाऱ्यांची भाजीच्या व्यवहारासाठी ये-जा सुरू असते.
त्याचप्रमाणे बेळगाव तालुक्यासह अन्य तालुके आणि जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या ठिकाणी भाजी घेऊन येत असतात. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढवणारी परिस्थिती आज येथे निर्माण झाली होती.
बेळगावातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे कोरोना संदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. सरकारने तर आता विकेंड कर्फ्यू देखील लागू केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इतका सर्व आटापिटा केला जात असताना दुसरीकडे जयकिसन होलसेल खाजगी भाजी मार्केटमध्ये परस्परविरोधी चित्र पहावयास मिळाले.
भाजीपाला हा नाशवंत माला असल्यामुळे विकेंड कर्फ्यूमधून त्याला सूट देण्यात आली आहे. मात्र जय किसान मार्केटमध्ये भाजी खरेदी विक्रीचे व्यवहार नियम पाळून करण्याऐवजी संसर्गासाठी पोषक असे स्वैरपणे सुरू होते. सामाजिक अंतराच्या नियम पायदळी तुडवून मार्केटमध्ये बहुतांश लोक विनामास्क फिरत होते. या एकंदर प्रकारामुळे सुज्ञ जागरूक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.