Friday, April 26, 2024

/

आमदारांनी जाणून घेतल्या ‘या’ भागाच्या समस्या

 belgaum

गेल्या कित्येक वर्षात विकासापासून वंचित असलेल्या सदाशिवनगर शेवटचा क्रॉस या ठिकाणी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज सकाळी भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या मुख्य म्हणजे यावेळी नाला बांधकामाविषयी चर्चा झाली.

सदाशिवनगर शेवटचा क्रॉस हा परिसर गेल्या कित्येक वर्षापासून विकास कामांच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला आहे. या भागात कोणत्याच मूलभूत नागरी सुविधा व्यवस्थित नाहीत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निधी मंजूर झालेला असतानाही नवीन गटार बांधकाम अथवा नाला बांधकाम यासारखी विकास कामे याठिकाणी हाती घेण्यात आलेली नाहीत.

परिणामी या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गटार व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणच्या घराघरांमध्ये पाणी शिरते. येथील समस्यांसंदर्भात वेळोवेळी महानगरपालिकेकडे तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. या बाबतीची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज शुक्रवारी सकाळी सदाशिवनगर शेवटचा क्रॉस परिसराला भेट दिली.

 belgaum

सदर भेटीप्रसंगी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी परिसराचा पाहणी दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रामुख्याने नाला बांधकामाबाबत विशेष चर्चा झाली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार बेनके यांनी लवकरात लवकर आवश्यक विकास कामे या ठिकाणी राबविली जातील असे आश्वासन दिले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले, अनिल चव्हाण, अभिषेक मठपती, शिवाजी शिंदे, सागर शिंदे, शरणू गंधीगुडी, सुरेश दळवाई आदींसह सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथील रहिवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.