महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांपेक्षा सीमाप्रश्न सुटावा यासाठी एन. डी. पाटील साहेब सातत्याने अग्रणी राहिले. महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा बाळगणाऱ्या सीमावासियांसाठी एन. डी. साहेब आशास्थान होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठा मंदिर येथे आज बुधवारी सायंकाळी आयोजित महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री दिवंगत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, कामगार नेते माजी प्राचार्य आनंद मेणसे माजी महापौर शिवाजी सुंठकर आदी उपस्थित होते.
आपल्या श्रद्धांजलीपर भाषण माजी आमदार मनोहर किणेकर पुढे म्हणाले की, सीमाप्रश्नी सातत्याने अग्रणी राहिलेल्या एनडी साहेबांची आपल्या हयातीत हा प्रश्न सुटावा ही इच्छा मात्र दुर्दैवाने अपूर्ण राहिली. लोकशाहीच्या मार्गाने अनेक लढे एन. डी. साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले. परंतु सीमाप्रश्न केंद्राने जशी अग्रेसर भूमिका घ्यायला पाहिजे होती तशी घेतले नाही. त्यामुळेच 2004 साली एन. डी. साहेबांच्या नेतृत्वाखाली सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला.
तेंव्हापासून सातत्याने त्यांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांगाने प्रयत्न केले. महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा बाळगणाऱ्या सीमावासियांसाठी एन. डी. साहेब आशास्थान होते. त्यांच्याबाबतीत आत एक बाहेर एक असे कधीच नव्हते. महाराष्ट्रात त्यांनी शेतकरी व कामगारांच्या कल्याणासाठी मोठे कार्य केले. सहकार मंत्री असताना एकाधिकार कापूस खरेदी योजना ही त्यांनीच महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू केली आणि सहकार मंत्री या नात्याने ती यशस्वीरीत्या चालवली असे सांगून शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठेही अन्याय झाला की ते धावून येत. बेळगावातील भूसंपादनाच्या वेळी आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेत होतो. त्यानुसार आम्ही लढत होतो असेही किणेकर यांनी सांगितले.
प्रा. आनंद मेणसे यांनी अलीकडे दहाएक वर्षाच्या कालावधीत समाजवादी प्रबोधिनीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या चळवळीत आपल्याला एन. डी. साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने फार मोठा धक्का बसला आणि गतस्मृती जाग्या झाल्या. माझ्या मते ते सीमा चळवळीचे नेते होते हे 100 टक्के सत्य. कारण तो त्यांचा ध्यास होता, मात्र आपण त्यांना तेवढ्याच चौकटीत मर्यादित ठेवू नये. ते अन्य कांही मोठ्या चळवळींचे नेते होते. शिक्षण सर्वांसाठी असावे यासाठी ज्या चळवळी झाल्या त्यात त्यांचा पुढाकार होता. आजची परिस्थिती पाहता शिक्षण हे श्रीमंत लोकांना पुरते मर्यादित राहिले असे वाटत आहे आणि अशा काळात एन. डी. गेले आहेत. सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना सध्या कालबाह्य होत आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. ज्या हमीभावासाठी सव्वा वर्ष दिल्लीच्या सरहद्दीवर सत्याग्रह सुरू होता. मला वाटतं एन. डी. यांची सारी हयात हमीभावासाठी गेली असे सांगून डॉ. एन. डी. पाटील यांनी ‘शेतकऱ्यांच्या उत्पादनांच्या हमीभावाचा प्रश्न’ या शीर्षकाखाली पुस्तकही लिहिले आहे, असे मेणसे यांनी सांगितले.
दीपक दळवी यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात विविधांगाने एन.डी. यांनी आपले जीवित कार्य पुढे नेले. त्यांच्या कार्याची उंची वाचत असताना किंवा माहिती घेताना एन. डी. खरोखर आपल्यातून गेले यावर विश्वास बसत नाही. एन. डी. साहेब गेले असे मी म्हणणार नाही. ते आमच्यात आहेत आमच्यात घेतलेले आहेत, त्यांचे विचार आणि त्यांची तळमळ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एनडी आमच्यातून गेलेले नाहीत असे सांगून त्यांचे विचार त्यांची ध्येय महाराष्ट्रात कांहीही असतील मात्र त्यांनी या आपल्या सीमाभागाच्या छोट्याशा पट्ट्यातील लोकांना जागृत केले. एका मोठ्या दमण शाहीच्या विरोधात तुम्ही सत्यासाठी लढता हे बीज त्यांनी आमच्या रोवल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी मालोजीराव अष्टेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर दीपक दळवी यांच्या हस्ते दिवंगत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थितांपैकी अन्य काही मंडळींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
कार्यक्रमात शोक प्रस्ताव मांडून संमत करण्यात आला. कार्यक्रमास माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, मराठा बँकेचे माजी चेअरमन लक्ष्मण होनगेकर, नवहिंद सोसायटी खानापूरचे चेअरमन गोपाळराव पाटील, मराठा संस्कृती भवनचे आप्पासाहेब गुरव, युवा समितीचे श्रीकांत कदम, सरचिटणीस मनोहर संताजी, माजी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील, दत्ता उघाडे, मोतेश बारदेस्कर, आदींसह महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच एन. डी. पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी रणजीत चव्हाण -पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.