महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सायंकाळी मराठा मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करून महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिवंगत प्रा डॉ एन डी पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेत पुढील प्रमाणे शोकप्रस्ताव मांडून संमत करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे कैवारी शेतकरी कष्टकरी यांचे आधारस्तंभ सीमाभागातील मराठी जनतेचे मार्गदर्शक पुरोगामी विचारवंत आदरणीय डॉ. एन. डी. पाटील साहेब यांचे 17 जानेवारी 2021 रोजी निधन झाले.
सीमा लढ्यातील अन्याय पीडित जनतेबरोबर गेली 65 वर्षे अवरितपणे संघर्ष करणारा एक दिपस्तंभ आज निमाला. सीमाप्रश्नाचे गाढे अभ्यासक असणारे एन. डी. साहेब महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकारी समितीचे सभासद आणि तज्ञ समितीचे अध्यक्ष होते.
सीमाभागातील प्रत्येक लढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग प्रत्येक मराठी माणसाला ऊर्जा देणारा प्रचंड स्त्रोत होता. त्यांच्या निधनाने गरीब कष्टकरी शेतकरी आणि सीमावासीय जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे.
एन. डी. पाटील साहेब यांचे कार्य येथील मराठी जनता कायम स्मरणात ठेवून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कार्य करीत राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजची ही सभा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे.