belgaum

सांबरा (ता. जि. बेळगाव) येथील सिद्धकला क्रिकेट क्लब तर्फे आयोजित मर्यादित 8 षटकांच्या आमदार चषक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला नुकताच उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या आज झालेल्या सामन्यांमध्ये चव्हाटा शिनोळी, शिवसेना मुतगा आणि साई काकती या संघांनी विजय नोंदविले.

सिद्धकला क्रिकेट क्लबतर्फे सांबरा मैदानावर आयोजित या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन काल झाले. सदर उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि नूतन विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते. या उभयतांच्या हस्ते यष्टी पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी जि. पं. सदस्य नागेश देसाई यांच्यासह मान्यवर मंडळींसह क्रिकेट प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात यजमान सिद्धकला क्रिकेट क्लब संघाने प्रतिस्पर्धी शिवसेना संघाला 8 धावांनी पराभूत केले.

प्रथम फलंदाजी करताना सिद्धकला क्रिकेट क्लबने मर्यादित 10 षटकात 5 गडी बाद 90 धावा झळकाविल्या. प्रत्युत्तरादाखल फलंदाजीस उतरलेला शिवसेना संघ सिद्धकलाच्या मोहन हरजी याच्या भेदक गोलंदाजीसमोर तग धरू शकला नाही आणि त्यांचा डाव सर्वबाद 82 धावा असा संपुष्टात आला. या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी मोहन हरजी हा ठरला. मोहन याने 3 षटकात 11 धावा देऊन तब्बल 5 गडी बाद केले.

आज सोमवारी स्पर्धेला रीतसर सुरुवात झाली. आज झालेल्या सामन्यांमध्ये चव्हाटा शिनोळी, शिवसेना मुतगा आणि साई काकती या संघानी प्रतिस्पर्धी संघावर विजय नोंदविले.

उद्या मंगळवार दि. 4 जानेवारी रोजी होणारे सामने : 1) इंडिया बॉईज एसबीआर वि. शिवसेना (बी) मुतगा, (सकाळी 8 वा.), 2) एनसी बीएलके वि. कालापहाड एसबीआर (सकाळी 10 वा.), 3) गौडवाड विरुद्ध सलमान पंत बीएलके (दुपारी 12 वा.), 4) मुत्त्यानट्टी विरुद्ध जिजामाता ए निलजी (दुपारी 2 वा.), 5) सिद्धकला एसबीआर वि. मराठा बसरीकट्टी (दुपारी 3:30 वा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.