साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा’ या सुभाषिताप्रमाणे फक्त अतिमहनीय व्यक्तींच्या आगमनाप्रसंगी शहराची तात्पुरती रंगरंगोटी आणि स्वच्छता करणे हे आपल्या देशात कांही नवीन नाही. कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावकरांनाही आता त्याची प्रचिती येत आहे.
बेळगावमध्ये राज्य विधिमंडळाचे दहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन झाले आणि त्यासाठी बहुतांश काळ बंद अवस्थेत असणारे शहराच्या प्रमुख रस्त्यांवरील पथदीप अचानक प्रकाशमय झाले. कोटेकेरी अर्थात किल्ला तलावानजीकचा उत्तुंग राष्ट्रध्वज पुन्हा अभिमानाने फडकू लागला. तसेच दुर्दशा झालेल्या तिसऱ्या रेल्वे गेट रस्त्याच्या डांबरीकरणासह अनेक विकास कामे युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण करण्यात आली. शहरातील प्रमुख चौकांमध्ये रंगरंगोटी करण्यात आली.
तथापि आता अधिवेशन समाप्त झाल्यामुळे हा दिखावा देखील समाप्त झाला आहे. अधिवेशन काळात 10 दिवस दिमाखात फडकणारा राष्ट्रध्वज पुन्हा ध्वजस्तंभावर चढलेला नाही. शहरातील प्रमुख मार्गांवरील पथदीपांची देखील कांही वेगळी अवस्था नाही. ज्या हॉस्पिटल रोडवरील पथदीप अधिवेशन काळात झगमगत होते ते आता बंद अवस्थेत अंधारात सामावले गेले आहेत. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या सरकार आणि प्रशासनाच्या कृतीचा सध्या धिक्कार केला जात आहे. सोशल मीडियावर या बाबतीत सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या शंख केला जात असून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.