Friday, April 26, 2024

/

वाढीव जीएसटी फेरविचार व्हावा

 belgaum

वस्त्र, पोशाख व पादत्राणे यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 5 टक्क्यांवरून 12 टक्के इतका वाढवण्यात आल्यामुळे विणकर, व्यापारी आणि संबंधित कारागीर संकटात सापडले आहेत. तेंव्हा या जीएसटी वाढीचा फेरविचार केला जावा, अशी विनंती द बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बेळगाव ट्रेडर्स फोरमच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी बेळगाव येथील आयकर खात्याच्या सेंट्रल टॅक्सिस गुड्स ॲन्ड सर्व्हिसचे मुख्य आयुक्त बसवराज नलगावे यांना सादर करण्यात आले. आयुक्त नलगावे यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. सरकारने गेल्या 18 नोव्हेंबर 2021 रोजी काढलेल्या नोटिफिकेशननुसार वस्त्र, पोशाख आणि पादत्राणांवरील जीएसटी कर 5 टक्क्यांवरून 12 टक्के इतका वाढविण्यात आला आहे. याचा अतिरिक्त भार या क्षेत्रातील व्यापारी, विणकर आणि संबंधित इतर लहान कारागिरांवर पडणार आहे.

त्याचप्रमाणे ही दरवाढ कच्चामाल खास करून सूत, पॅकिंग आदींच्या महागाईला तोंड देणाऱ्या वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम करणार आहे. वस्त्रोद्योगाची मूल्य साखळी प्रथम कापूस, मग धागे, त्यानंतर सुत, रचना, वस्त्र तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यानंतर वस्त्र अशी मूल्यवर्धन प्रक्रिया आहे. सध्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील इतर विभागात कच्चामाल व धाग्यांसाठी 18 टक्के जीएसटी आहे. त्यामागोमाग सूत उत्पादनावर 12 टक्के आणि वस्त्र विणकाम (पॉवरलूम उद्योग), वस्त्रोद्योग व्यापारी, वस्त्र प्रक्रिया केंद्र आणि तयार कपड्यांवरील जीएसटी 5 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे जीएसटी वाढीचा परिणाम या क्षेत्रात लाखोच्या संख्येने काम करणाऱ्या लोकांवर होणार आहे.Gst memo

 belgaum

देशातील पावरलूम उद्योग क्षेत्रात सुमारे 24 लाख लूम मशीन्स आहेत. यापैकी जवळपास 7.5 लाख फक्त एकट्या सुरत -गुजरातमध्ये आहेत. जीएसटी वाढीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पॉवरलूम उद्योगावर निश्‍चितपणे होणार आहे. या कर वाढीमुळे वस्त्र पोशाखांची दरवाढ होणार, परिणामी ग्राहक त्याकडे पाठ फिरवणार आणि त्याची किंमत व्यापाऱ्यांना मोजावी लागणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या संकटानंतर सध्या आपल्या अर्थव्यवस्थेची हळूहळू घडी बसत आहे. या परिस्थितीत ही जीएसटी वाढ व्यापारी वर्गाला कठीण परिस्थितीत आणि त्रासात टाकणारी ठरणार आहे.

त्यामुळे आपण याचा गांभीर्याने विचार करावा आणि अर्थव्यवस्था तसेच व्यापार -वाणिज्य क्षेत्राच्या हिताच्या दृष्टीने युद्धपातळीवर योग्य ती कार्यवाही करावी, अशा आशयाचा तपशील बेळगाव ट्रेडर्स फोरमने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना धाडलेल्या निवेदनात नमूद आहे. आयुक्त नलगावे यांना निवेदन सादर करतेवेळी सतीश तेंडुलकर यांच्या समवेत शेवंतीलाल शहा, राजेंद्र जोशी, विकास कलघटगी, राजू खोडा आदींसह फोरमचे अन्य सदस्य व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.