राष्ट्रीय पक्षांपासून दूर झालेल्या मराठी मतांमुळे विधानपरिषदेत लखन जारकीहोळी हे अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अनेक राजकीय जाणकारांनी हे मत व्यक्त केले आहे. अपक्ष उमेदवाराच्या निवडून येण्याला पूर्णपणे मराठी मते कारणीभूत आहेत.बेळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे आणि या लोकप्रतिनिधींनी काँग्रेस आणि भाजप वगळता विशेषता भाजपला फाटा देऊन आपले मत अपक्ष उमेदवाराला दिले असल्याची बाब उघड होत आहे.
*बेळगाव खानापूर निपाणीत बसला फटका*
कर्नाटक विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बेळगाव खानापूर आणि निपाणी या भागातील मराठी लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. या लोकप्रतिनिधींनी आपले मत अपक्ष उमेदवाराला दिल्यामुळे लखन यांचा विजय झाला असल्याची बाब नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपच्या बाजूने असलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या कमी असल्याची बाब निदर्शनास येते.किंवा अधिकृतरित्या भाजपचे असले तरी काही कारणांनी मनाने दूर गेलेले वाढत आहेत. संबंधितांपैकी मराठी लोकप्रतिनिधींनी अपक्ष उमेदवाराला मत देण्यास जास्त पुढाकार दाखवला आहे .राष्ट्रीय पक्षांकडून नेहमीच मिळत असलेली सापत्नभावाची वागणूक याला कारणीभूत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.
*भाजपला सेट बॅक*
विधान परिषद निवडणुकीचे निकाल हा भाजपला सेटबॅक ठरत असला असल्याने भाजपची सध्या या दोन जागांच्या बाबतीत नाचक्की झाली आहे. मागील वेळी विधान परिषद सदस्य म्हणून काम केलेल्या महांतेश कवटगीमठ यांना पराभव पत्करावा लागणे ही बाब भाजपच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेली भरभरून मते,बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत मिळालेले कौल आणि त्यानंतर मिळालेल्या वागणुकीतून बदललेला कौल याचा विचार आता भाजपने करण्याची गरज आहे. विधानपरिषद निवडणुकीत जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी आपल्यालाच मत घालणार या अविर्भावात वागणाऱ्या भाजपला मोठा फटका बसला. विशेषता मराठी भागातील बेळगाव खानापूर आणि निपाणी चिकोडी भागातील लोकप्रतिनिधींनी भाजपच्या उमेदवारांना नाकारले असल्याचे दिसून येत आहे.
*विधानसभेला होणार परिणाम?*
आगामी एक वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम होणार असल्याचे राजकीय जाणकार बोलून दाखवू लागले आहेत. भाजपची मते कमी झाल्यामुळे याचा फटका संपूर्ण राज्यभरात भाजपला बसण्याची शक्यता आहे. केवळ बेळगाव विधानपरिषद नव्हे तर विधानसभेतही याचे परिणाम दिसतील. भाजपने १२ आणि ११ जागा काँग्रेसने मिळवल्यामुळे काँग्रेस ही काटे की टक्कर देऊ शकतो हे जनतेच्या लक्षात आले आहे .त्यामुळेच लोकप्रतिनिधींच्या मतांचा कल विचारात घेता त्या लोकप्रतिनिधीना मते घालणारे नागरिकही या पुढील काळात काँग्रेसकडे आणि इतर पक्षांकडे झुकणार आहेत की काय असे चित्र पाहायला मिळत आहे.
काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांना नाही म्हणणाऱ्या मराठी मतदारांनी आपला कौल दाखवला असल्यामुळे भाजपला त्रासदायक ठरणार आहे. एकंदर परिस्थितीत सीमाभागात भाजपच्या मराठी व्होट बँकेला धोका निर्माण झाला आहे. मराठी मते हिंदुत्वाच्या जोरावर आपल्याला नेहमीच मिळतात अशा आत्मविश्वासात राहणाऱ्या भाजप नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आहे.
दरवेळी भगवा ध्वज हाती घेऊन मते मागताना भगवा संकटात आल्यानंतर मराठी भाषिकांच्या समस्यांकडे पाठ फिरवणाऱ्या भाजप नेत्यांना आता या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे लागेल. अन्यथा पुढील निवडणुकात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे राजकीय जाणकार बोलून दाखवत आहे.