Wednesday, January 15, 2025

/

पोर्तुगीजकालीन ‘या’ रस्त्याला मंजुरी; पारवाडचे उजळले भाग्य

 belgaum

आता गोव्यात जाण्यासाठी पारवाड (ता.खानापूर) मार्गे केवळ 10 कि. मी. अंतर कापावे लागणार असून एका तासात पायी चालत गोवा गाठता येणार आहे. पारवाड आणि गोव्यातल्या साट्रे गावांमधील पोर्तुगीजकालीन रस्ता तसेच म्हादाई नदीवरील ब्रिजला गोवा शासनाने नुकतीच मंजुरी दिल्यामुळे हे घडणार आहे.

खानापूर तालुक्यातल्या पारवाड गावचे भाग्य उजळले आहे. कणकुंबी तसेच पारवाड गावातील नागरिक भात रोपणीच्या कामासाठी साट्रे च्या मार्गे गोव्यात जातात, पोर्तुगीज काळापासून हा रस्ता असल्याने नागरिकांचा गोव्याशी मोठा संपर्क आहे.या भागात मोठ्या प्रमाणात होणारी संगीत नाटकांचे, भजनी -भारुडे आणि अन्य उत्सवासाठी पडदे आणि वाध्ये याच मार्गाने डोकीवर वाहून कर्नाटकात आणली जायची.

त्यामुळे हा रस्ता स्थानिक नागरिकांना खूप उपयुक्त होता. मात्र अलीकडे या रस्त्याचा विकास न झाल्याने झुडपे वाढून भग्नावस्थेत असलेला ब्रिजही ढासळून गेला आहे. सद्या केवळ पाणंद शिल्लक आहे. त्यामुळे या वाटेवरून पायपीट करणे धोक्याचे ठरते.

या संदर्भात साट्रे गावातील नागरिकांनी नगरगाव पंचायतीत गेल्या ऑक्टोबर महिन्यात ठराव संमत करून यासाठी गोवा शासनाकडे पाठपुरावा केला होता. नुकताच गोव्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी साट्रे पारवाड रस्ता कामाला तातडीने मंजुरी मिळवून दिली आहे.Poturgees bridge

सध्या कर्नाटकातून गोव्याला जाण्यासाठी जवळपास 65 कि. मी.चे अंतर आणि त्यात 30 कि.मी. चा घाट उतरावा लागतो. मात्र पारवाडमधून या रस्त्याने गेल्यास केवळ 10 -15 कि. मी. अंतर लागणार आहे. त्यामुळे गोव्यातील गावांचे सीमेवरच्या गावांशी मैत्रीपूर्ण संबंध जुळून येण्यासाठीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पोर्तुगीज काळात वाळपई, नागोडा, कोदाळी, साट्रे व त्यापुढे कर्नाटकातील पारवाड गावाला जोडणारा रस्ता अस्तित्वात होता. या रस्त्याने तेंव्हा पोर्तुगीज सैनिक आणि अधिकारी ये -जा करत होते. मात्र गोवा मुक्ती लढ्याप्रसंगी भारतीय सैन्याला रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी पारवाड आणि साट्रेच्या मध्ये असणाऱ्या म्हादाई नदीवरील मोठा दगडी पूल सुरुंग लावून तोडला होता. त्यामुळे गोवा आणि कर्नाटकाचा संपर्क तुटला. गोवा मुक्तीनंतर या रस्त्याकडे गोवा शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्याने अस्तित्व गमावले. त्यानंतर चोर्ला घाट मार्गे नवा मार्गतयार करण्यात आला.Poturgees road

आता पारवाड ते साट्रे हा पोर्तुगीज आणि ब्रिटिश कालीन रस्ता लवकरच पूर्णत्वास येणार आहे. हा रस्ता झाल्यास पारवाड गावासह कणकुंबी आणि त्या शेजारील गवळी वाड्यांना देखील चांगले दिवस येतील. पारवाड आणि गोव्यातली संस्कृती एकच असल्याने कला- साहित्य, खानपान आणि रोटीबेटी व्यवहार वाढतील.

तसेच पारवाड गावासाठी उत्पन्नाचे कोणतेच स्त्रोत नसल्याने गोव्यातील कामावर गावचे अर्थकारण चालते. त्यामुळे भविष्यात पारवाड गावाला अच्छे दिन येणार असल्यामुळे साट्रेसह पारवाड गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.