शिक्षणही जगातील सर्वात श्रेष्ठ शक्ती आहे हे लक्षात घेऊन विश्व विद्यालयांनी ज्ञानार्जनाला पूरक असे वातावरण निर्माण करण्याबरोबरच विद्यापीठं ही नाविन्याची केंद्र बनली पाहिजेत, असे विचार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले.
हिरेबागेवाडी येथील मल्लप्पन डोंगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इमारत बांधकाम कोनशिला समारंभ आज बुधवारी प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थनारायण सी. एन., मजुराई हज आणि व खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षण ही जगातील सर्वात श्रेष्ठ शक्ती आहे. या शक्ती समोर सर्वाना झुकावे लागते, हे ध्यानात घेऊन विद्यापीठाने शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच शिक्षणास पोषक वातावरण निर्मिती करावी.
विद्यापीठे नाविन्याची निर्मिती केंद्र बनली पाहिजेत. विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल शक्य आहेत हे ध्यानात घेऊन त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे असे सांगून शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी शासन नेहमीच सहकार्य करेल. राणी चन्नम्मा विद्यापीठ एक आदर्श विश्व विद्यापीठ व्हावे. ही नवी इमारत अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बनवून या विद्यापीठाची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावी, असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.
उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थनारायण सी. एन. यांनी आपल्या भाषणात बेळगाव जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकार सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यासाठीच राणी चन्नम्मा विद्यापीठाला ही जमीन देण्यात आली आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांचे सक्षमीकरण केले जाईल, असे सांगितले. मंत्री शशिकला जोल्ले यांनी देखील यावेळी समयोचित विचार व्यक्त केले.
कुलपती प्रा. बसवराज पद्मशाली यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एम. रामचंद्रगौडा, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, विधान परिषद सदस्य अरुण शहापूरकर, डॉ. तलवार साबण्णा, हणमंत निराणी आदींसह प्राध्यापक, विद्यार्थी -विद्यार्थिनी, कर्मचारीवर्ग, निमंत्रित आणि हितचिंतक याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते.