कनकदास कॉलनी अनगोळ येथील संगोळी रायण्णाच्या पुतळ्याची शुक्रवारी रात्रीच्या सुमारास विटंबना करण्यात आली.
या घटनेचा रायण्णा यांच्या अनुयायांनी शनिवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कल येथे निषेध केला. दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी रात्री धर्मवीर संभाजी चौकात अचानक निदर्शने करण्यात आली. शेकडो नागरिक दाखल झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
बेळगाव शहरामध्ये कलम 144 अन्वये आज सकाळी आठ ते रविवार सहा वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक जमाव बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
शहरातील विविध ठिकाणी दगडफेक आणि वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी कॅम्प खडेबाजार आणि मार्केट पोलिस ठाण्यात एकूण 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
27 आरोपींना अटक झाली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाईलवर आणि संदेश ऍप्लिकेशन्सवरील प्रतिमांच्या स्वरूपात पसरवल्या जाणार्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.जर कोणाला असे मेसेज आले तर कृपया ते फॉरवर्ड करू नका ज्याद्वारे या अफवा पसरू शकतात.
बेळगाव शांतताप्रिय आहे आणि आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक नागरिक शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणार्या अधिकाऱ्यांना सहकार्य करेल. गुन्हेगारांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार असून पोलिस आधीच घटनांचा तपास करत आहेत,असे आवाहन पोलीस आयुक्तालयाने केले आहे.