खादरवाडी बेळगाव येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पिरनवाडी नजीक शनिवारी दुपारी झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
गंगाधर मारुती चवरी (वय 21) असे मयत तरुणाचे नांव आहे. त्याच्या वडिलांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संशयास्पद मृत्यू असे या घटनेची नोंद केली आहे.
पोलिस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गंगाधरचे कुटुंबीय मूळचे खानापूर तालुक्यातील पडलवाडीचे असून सध्या ते खादरवाडी येथे वास्तव्यास आहेत.
गंगाधर शुक्रवारी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी पिरनवाडी नजीक शेतवाडीतील काजूच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.
प्रथमदर्शनी गंगाधरने आत्महत्या केल्याचे दिसून येत असले तरी कुटुंबीयांनी मात्र त्याच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. सिव्हिल हॉस्पिटल शवागारात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. आता शवचिकित्सेचा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच या प्रकरणातील संशय दूर होणार आहे.