Monday, May 6, 2024

/

शेतकऱ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच…

 belgaum

सुपीक शेत जमिनीतून होणारा हलगा -मच्छे बायपास रस्ता रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन आज सलग चौथ्या दिवशी सुरूच आहे. येळ्ळूर रोड येथील बायपासच्या ठिकाणी शहापूर शिवारामध्ये आज सकाळपासून शेतकऱ्यांनी शांततेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रयत संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब देसाई आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी नेत्यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.

हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात आज रविवारी चौथ्या दिवशी शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. शहापूर शिवारातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची आज रयत संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब देसाई यांनी भेट घेतली. यावेळी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले की, या सुधारण्याला आमचा विरोध नाही. त्याला आम्ही आडकाठी करणार नाही. परंतु गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी सुधारणा केली जाऊ नये असे आमचे मत आहे. एखाद्या शेतकऱ्याची फक्त 1 एकर शेती आहे. त्यावर त्याचा चरितार्थ चालतो.

त्याचे संपूर्ण कुटुंब त्या जमिनीवर अवलंबून आहे, ती जमीनच जर गेली तर तो शेतकरी कसा जगणार? कारण आज कोठेही नोकरी मिळणे अवघड आहे. चांगली शिकलेली मंडळी बेरोजगार फिरत आहेत. आपली स्वतःची शेती आहे या भरवशावर आज गरीब शेतकऱ्यांची मुले घरखर्चाला हातभार लागावा म्हणून शिकून नोकरी करत आहेत. नोकरीत कांही झाले तर आपली शेती तर आहे हा विचार त्यांना मानसिक आधार देत असतो. परंतु या पद्धतीने असलेली 1 एकर शेती गेल्यानंतर त्या मुलांची परिस्थिती काय होणार? त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय होणार? याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. अन्यथा अशा शेतकरी कुटुंबांसमोर सामुहिक आत्महत्ये शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असे आप्पासाहेब देसाई यांनी स्पष्ट केले.Farmers protest

 belgaum

सरकारने ज्या -ज्या ठिकाणी जमिनीचे भूसंपादन केले आहे त्या -त्या ठिकाणी योग्य नुकसान भरपाई दिलेली नाही. त्याचप्रमाणे शेत जमीन हे शेतकऱ्यांचे दैवत आहे. त्याच्या मोबदल्यात कितीही पैसे सोने-नाणे दिले तरी त्याचा उपयोग नाही. शेत जमीन गेली तर खरा शेतकरी जगू शकणार नाही. संसदेत बसणारे कोट्याधीश आहेत. एसी खोल्यांमध्ये बसणाऱ्या या लोकांना शेती आणि शेतकऱ्यांचे मोल कधीच कळणार नाही. तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कर्नाटकातील राज्यकर्त्यांना माणुसकी असेल तर त्यांनी हलगा -मच्छे बायपास रस्त्यासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन बळकावू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे, असेही देसाई म्हणाले.

याप्रसंगी मारुती कडेमणी, नामदेव धुडूम, बळवंत रूटकुटे, राजू मरवे, भोमेश बिर्जे, तानाजी हलगेकर, महेश चतुर, भैरू कंग्राळकर, मनोहर कंग्राळकर, मोनाप्पा बाळेकुंद्री, हणमंत बाळेकुंद्री, गुंडू भागाण्णाचे, नितीन पैलवानाचे, विनायक हलगेकर, नागेश काजोळकर, आनंदराव काजोळकर, किरण सांबरेकर, विलास घाडी, मारुती बिर्जे, सोमनाथ चतुर आदी आंदोलनकर्ते शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान, आज रविवारी चौथ्या दिवशीही पोलीस संरक्षणात बायपास रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.