बेळगाव शहरातील पथदीप नादुरुस्त असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्वतः नाईट पेट्रोलिंग करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यामुळे अवघ्या तीन दिवसात विविध ठिकाणचे बंद पडलेले पथदिवे पूर्ववत सुरू झाले आहेत.
शहरातील पथदीप नादुरुस्त असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. याबाबत सातत्याने तक्रार करूनही दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी गेल्या सोमवारी रात्री शहराच्या विविध भागात फेरफटका मारून नादुरुस्त पद्धती यांची माहिती जाणून घेतली.
तसेच सदर बाब मनपाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून पथदीप दुरुस्त करण्याची सक्त सूचना केली होती. त्यानुसार संबंधित भागातील नादुरुस्त पथदीप युद्धपातळीवर दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. अवघ्या तीन दिवसात ही कार्यवाही झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, भावी काळात देखील आपण वेळोवेळी रात्रीच्या वेळी शहरात फेरफटका मारुन सर्व ठिकाणचे पथदीप 100 टक्के सुरू आहेत की नाही?
याची शहानिशा करणार आहोत, असे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले आहे. आमदार बेनके यांच्या या कर्तव्य दक्षतेबद्दल नागरिकांमध्ये प्रशंसोद्गार काढले जात आहेत.