दिवाळी उंबरठ्यावर असल्यामुळे सध्या बेळगावातील घरगुती फराळाला वाढती मागणी आहे. कांहीजण तर आपला घरगुती फराळ अमेरिका, कॅनडा यासारख्या देशांमध्ये निर्यातही करत आहेत. सध्याच्या प्रगत परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे दीपावली निमित्त अलीकडे अनेक जण पारंपारिक पद्धतीने घरी तयार करण्यात आलेला फराळ खरेदी करणे पसंत करतात. यामुळे अनेक बेरोजगार स्त्री-पुरुषांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांची चांगली कमाई होत आहे. अनेकांनी केटरिंगचा व्यवसाय सुरू केला असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापैकीच एक असणारे प्रदीप रानडे हे दीपावली निमित्त सुमारे 50 कुटुंबांना वेळेवर फराळ पोचवणे आवश्यक असल्यामुळे गेले 15 दिवस अतिशय व्यस्त होते.
केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या प्रदीप रानडे यांना फराळ बनवण्याच्या कामात त्यांची पत्नी स्वाती आणि दोन मुलांचे सहकार्य लाभत असते. आपल्या व्यवसायाबद्दल बोलताना प्रदीप रानडे म्हणाले की, दिवाळीसाठी शहरातील आणि शहराबाहेरील अनेक जणांना यापूर्वीच आमच्याकडील घरगुती फराळ पोचवला आहे. माझ्या एका ग्राहकाने आमचा फराळ खरेदी करून तो कॅनडा येथील त्यांच्या मुलीकडे पाठविला आहे. तसेच एका ग्राहकाने जामनगर गुजरात येथील आपल्या मुलाला आमच्याकडील फराळ पाठविला आहे. गेली 5 वर्ष मी केटरिंगचा व्यवसाय करत असून आज माझ्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे व्यवसाय कमी झाला. तथापि यावर्षी व्यवसायाला चांगली गती मिळत आहे असेही रानडे यांनी सांगितले.
बेळगाव व्यतिरिक्त रानडे यांचे ग्राहक हुबळी-धारवाड रायचूर आणि गोव्यामध्ये विखुरले आहेत. त्यांच्याकडे बेसन लाडू, चकल्या, शंकरपाळ्या, मोतीचूर लाडू, शेव, चिवडा वगैरे विविध रुचकर फराळांचे जिन्नस बनविले जातात. मी जे फराळाचे जिन्नस तयार करतो ते बाजारपेठेतील दरापेक्षा महाग असतात. याला कारण म्हणजे आमच्याकडील सर्व खाद्यपदार्थ हे शुद्ध तुपामध्ये आणि स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेऊन बनवलेले असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राहकांना या खाद्यपदार्थांमध्ये घरगुती चव चाखायला मिळते, असे प्रदीप रानडे सांगतात.