न्यायालयाच्या आदेशालाही न जुमानता हालगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात राज्य सरकारसह अधिकारी वर्ग आणि लोकप्रतिनिधी सध्या ‘हम करे सो कायदा याप्रमाणे वागत’ असून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी आणि हा बायपास रस्ता रद्द करण्यासाठी आता विरोधी पक्षानेच पुढाकार घ्यावा आणि यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती शेतकऱ्यांनी आज केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली.
हालगा -मच्छे बायपास रस्ता रद्द करण्याची विनंती करण्यासाठी शेतकरी नेत्यांनी आज बुधवारी सकाळी शहरातील सह्याद्रीनगर येथील निवास्थानी केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी सदर बायपास रस्ता शेतकऱ्यांच्या दृष्टीने किती हानिकारक आहे याची माहिती दिली. या रस्त्यामुळे तिबार पीक देणारी सुपीक जमीन नष्ट होणार आहे. परिणामी बहुसंख्य शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
या रस्त्याच्या विरोधात शेतकरी लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. न्यायालयाकडून या रस्त्याला स्थगिती आदेश आलेला आहे. हा रस्ता करताना केंद्र सरकारने घालून दिलेले नियम देखील पायदळी तुडविले जात आहेत. एकंदर हम करे सो कायदा याप्रमाणे राज्य सरकार आणि सरकारी अधिकारी न्यायालयाला देखील न जुमानता पोलीस खात्याला हाताशी धरून दडपशाहीने हा बायपास रस्ता करत आहेत असे सांगून शेतकरी नेत्यांनी हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधातील आदेश व संबंधित कागदपत्रे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून दिली.
आमदार जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच आपण स्वतः बायपास रस्त्याच्या जमिनीची पाहणी करण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांवर होणारे अन्याय संदर्भात चर्चा करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार सतीश जारकीहोळी यांना न्यायालयीन आदेश व संबंधित कागदपत्रे दाखवून विनंती करताना शेतकरी नेते प्रकाश नायक म्हणाले की, सदर अन्यायकारक बायपास रस्त्यासंदर्भात आमचे कोणीच ऐकत नाही आहे. सध्या हम करे सो कायदा असे चालले आहे. आता तुम्हीच आम्हा शेतकऱ्यांना वाचू शकता. आम्हाला विचारणारे कोणीही नाही. सरकार ही नाही, अधिकारी ही नाही आणि लोकप्रतिनिधी देखील नाहीत. आम्ही मरणाच्या दारात आहोत, याचा कृपया गांभीर्याने विचार करावा. हा बायपास रस्ता झाला तर शेती नष्ट होणार आणि बेळगाव कुंदानगरी एवजी गंदानगरी होणार हे निश्चित आहे, असे नायक म्हणाले.
याप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, शेतकरी नेते राजू मरवे, प्रकाश नाईक,सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद, विलास घाडी, मारुती कडेमणी, नामदेव धुडूम, बळवंत रूटकुटे, भोमेश बिर्जे, तानाजी हलगेकर, महेश चतुर, भैरू कंग्राळकर, मनोहर कंग्राळकर, मोनाप्पा बाळेकुंद्री, हणमंत बाळेकुंद्री, गुंडू भागाण्णाचे, नितीन पैलवानाचे, विनायक हलगेकर, नागेश काजोळकर आदी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.