बेळगाव विमानतळावर इंडियन ऑइल कंपनीतर्फे 13 हजार चौरस फूट जागेवर एव्हीएशन फ्यूअल स्टेशन उभारण्यात येणार असून शुक्रवारी विमानतळ प्रशासन व इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांमध्ये त्याबाबतच्या समन्वय करार स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
बेळगाव विमानतळावर नाईट पार्किंगसाठी विमाने थांबतात. याबरोबरच दररोज सुमारे 13 विमान फेर्या होत असल्याने येथे मोठ्या एव्हीएशन फ्यूअल स्टेशनची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन इंडियन ऑइल कंपनी बेळगाव विमानतळावर 13 हजार चौरस फूट जागेवर एव्हीएशन फ्यूअल स्टेशन उभारणार आहे.
या विमानतळावर यापूर्वी एचपीसीएल कंपनीचे फ्यूअल स्टेशन होते. आता विमानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणखी एका एव्हीएशन फ्यूअल स्टेशनची आवश्यकता भासत होती. इंडियन ऑइलने एव्हीएशन फ्यूअल स्टेशन सुरू करण्यास सहमती दर्शविल्याने पुढील 3 वर्षासाठी समन्वय करार करण्यात आला आहे. या प्रसंगी बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य, हेमंत राठोड, विजय नाईक, पी. एस. देसाई आदी उपस्थित होते.
दरम्यान, केवळ बेळगाव विमानतळासाठी नव्हे तर विमानतळावर होणाऱ्या दोन फ्लाईंग स्कूलसाठी देखील हे एव्हीएशन फ्यूअल स्टेशन महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे आता इंधनासाठी इतर शहरावर अवलंबून राहावे लागणार नाही.
भविष्यात विमानाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने इंधनाच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यासाठी हे नवे एव्हीएशन फ्यूअल स्टेशन उपयुक्त ठरणार आहे.