राज्यातील सरकारी शाळांमधील मुलांसाठी गणवेशाचा दुसरा संच अखेर दोन वर्षाने येत असून समग्र शिक्षण अभियानाने (एसएसए) त्यासंदर्भात शाळा सुधारणा समित्यांना एक परिपत्रक जारी केले आहे.
शालेय वर्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे गणवेशासाठी कापड खरेदी करून शिलाई करावी आणि इयत्ता 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना ते पुरवावे. गणवेशाचा रंग निवडण्याचे स्वातंत्र्य ही शाळा सुधारणा समित्यांना (एसडीएमसी) देण्यात आले आहे. राज्यातील सरकारी शाळेतील मुलांना गणवेषाचा हा दुसरा संच 2019 -20 या शैक्षणिक वर्षात देण्यात येणार होता.
मात्र निधीच्या कमतरतेमुळे पुरवठा करण्यास विलंब झाला होता. मंत्रिमंडळाच्या गेल्या मार्च 2020 मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार समग्र शिक्षण अभियानाने शाळा सुधारणा समित्यांना एकूण 100 कोटी रुपये हस्तांतरित केले होते.
परंतु कोरोना प्रादुर्भावानंतर राज्य सरकारने शाळांना सुट्टी जाहीर केल्यामुळे गणवेशाचा दुसरा संच खरेदी थांबविण्याचे निर्णय सरकारने अधिकाऱ्यांना दिले होते.
मात्र आता 4 ऑक्टोबर 2021 च्या परिपत्रकाद्वारे शाळा सुधारणा समित्यांना गणवेशाच्या दुसऱ्या संचाच्या खरेदीसाठी मंजूर केलेल्या निधीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गणवेशाच्या दुसऱ्या संचाचा पुरवठा फक्त इयत्ता 6 वी ते 10 वीच्या मुलांसाठी असणार आहे.