राज्यातील सर्व शाळा सुरळीत सुरू झाल्या असल्या तरी यंदाच्या शैक्षणिक वर्षात 35 दिवस कमी भरणार आहेत. त्यासाठी शिक्षकांनी सहकार्य केल्यास दर शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरवण्यात येईल, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.
दावणगिरी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यंदा राज्यातील शाळा 35 दिवस उशिरा सुरू झाल्या आहेत. दसरा सणाची सुट्टी केवळ 10 दिवस देण्याद्वारे पाच दिवस भरून काढण्यात आले आहेत. शिक्षकांच्या सहकार्याने अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्य आहे. या वर्षी अभ्यासक्रमात कपात करण्याचा विचार नाही. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यावी यावर डिसेंबर महिन्यात तज्ज्ञांची बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती मंत्री नागेश यांनी दिली.
गतवर्षीप्रमाणे यंदाही अभ्यासक्रमात कपात केल्यास पुढील वर्षी वर्गात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. पुढील शैक्षणिक वर्षात प्राथमिक वर्गापासून नवे शैक्षणिक धोरण लागू करण्याचा विचार आहे. त्यासाठी आतापासून तयारी केली जात आहे.
मदनगोपाल यांच्या नेतृत्वाखाली कृती दल स्थापन केले आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण घटले आहे. मुलांना आपण फिरायला पाठवतो, समारंभांना पाठवतो, मग शाळेत का पाठवत नाही? असा प्रश्न उपस्थित करून कोरोनामुळे आतापर्यंत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोरोनाची तिसरी लाट आली तरच शाळा बंद करण्याचा अधिकार सरकारकडे असेल अन्यथा तोपर्यंत शाळा नियमित सुरू राहतील, असेही शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी स्पष्ट केले.