कामत गल्ली येथील श्री दुर्गा महालक्ष्मी मंदिराच्या श्री लक्ष्मी देवी महोत्सवाला मोठ्या भक्तिभावाने उत्साहात प्रारंभ झाला असून आज यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कामत गल्ली येथील सर्व पंच मंडळी श्री महालक्ष्मी देवस्थान कमिटी महोत्सव कमिटी आणि युवक मंडळांच्या पुढाकाराने पाच वर्षातून एकदा गल्लीतील श्री दुर्गा महालक्ष्मी मंदिराच्या महोत्सवाचे अर्थात यात्रेचे आयोजन केले जाते. कोरोना प्रादुर्भाव कारणास्तव यंदाचा हा यात्रोत्सव 8 वर्षानंतर आयोजित केला जात असून यात्रोत्सवातील सर्व धार्मिक विधी मंदिराच्या पुजारी भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज रामू पुजारी व ज्योती सुरज पुजारी हे पार पाडत असतात.
यंदाही भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी सुरू आहेत. यंदाच्या श्री लक्ष्मीदेवी महोत्सवाला गेल्या रविवारी देवीच्या मिरवणुकीने प्रारंभ झाला. गोकाक येथून आणण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची किल्ला येथून मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक कपिलेश्वर मंदिर, शनी मंदिर अनंतशयन गल्ली गणपत गल्ली पांगुळ गल्ली टेंगीनकेरी गल्ली मार्गे कामत गल्ली येथे समाप्त झाली. याठिकाणी मंडपामध्ये देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
देवीच्या पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पहिल्या दिवशी श्री मूर्तीचे आगमन मिरवणूक वगैरे कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशी दैनंदिन धार्मिक विधीसह देवीला गोड नैवेद्य दाखवण्यात आला. सलग पाच दिवस देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम तर सुरूच असून आजपासून तीन दिवस 28 ऑक्टोबरपर्यंत देवीची भर महोत्सव यात्रा होणार आहे. दरवेळी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी येत्या शुक्रवार दि 29 ऑक्टोबर रोजी मंडपातील श्री लक्ष्मी देवीच्या मूर्तीची मंदिरामध्ये विधिवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
मंदिराच्या मुख्य व ज्येष्ठ पुजारी भारती पवार यांनी बेळगाव लाईव्हला दिलेल्या माहितीनुसार दर पाच वर्षांनी भरणाऱ्या कामत गल्लीच्या श्री लक्ष्मीदेवी महोत्सवात देवीच्या आगमनाच्या मिरवणुकीसह पाच दिवस दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांसह आरती, ओटी भरणे कार्यक्रम, श्री शिवशक्ती महिला मंडळ व इतर महिला मंडळ यांचे भजन कार्यक्रम दांडिया तसेच लेझीम कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व थरातील भाविकांकडून देणगी स्वरूपात अथवा आपल्या परीने होईल तशी मदत केली जात असते.
यंदा देवीच्या मूर्ती रंगकामासह मंदिराची दुरुस्ती, आतील कमान यासाठी राजू कडोलकर, अण्णाप्पा कडोलकर, संजय घोडके व अनंत पाटील यांनी भरीव देणगी देऊ केली. त्याचप्रमाणे दरवेळी श्री लक्ष्मी देवी महोत्सव यशस्वी करण्यासाठी कामत गल्ली येथील सर्व पंच मंडळी, श्री महालक्ष्मी देवस्थान कमिटी, महोत्सव कमिटी श्री शिवशक्ती युवक मंडळ व महिला मंडळ तसेच माळी गल्ली, कसाई गल्ली, टेंगीनकेरी गल्ली, आझाद गल्ली येथील भाविकांचे विशेष सहकार्य लाभत असते.