बेळगाव विभागातील सात जिल्ह्यांची औद्योगीक अदालत नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीला राज्याचे लघु व मध्यम उद्योग मंत्री मुरुगेश निराणी उपस्थित राहणार आहेत.
औद्योगिक विकास आणि समस्या निवारणासाठी सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि प्रश्न 10 नोव्हेंबर पर्यंत लेखी स्वरुपात देणे बंधनकारक आहे. तसेच उद्योजक किंवा संस्थांना एकच अर्ज करता येणार आहे. त्यामुळे उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्योग विकास किंवा प्रकल्पाच्या ठिकाणी कोणतेही काम हाती घेताना येणाऱ्या अडचणी मांडून त्या सोडवून घेण्यासाठी ही अदालत उपयुक्त ठरणार आहे. त्यात पाणी, वीज, रस्ते, भुयारी गटारींची दुरुस्ती यासह मूलभूत सुविधांसंदर्भातील अडचणी असल्यास त्या जरूर मांडाव्यात.
औद्योगिक औद्योगिक अदालतीमध्ये त्यावर चर्चा करून त्या सोडविल्या जातील असा विश्वास व्यक्त करण्याबरोबरच बेळगाव उपविभागातील उद्योजकांनी पूर्ण तपशील विहित अर्ज क्रमांक -1 भरून जिल्हा उद्योग केंद्र, उद्यमबाग बेळगांव येथे द्यावेत, असे जिल्हा औद्योगिक विकास विभागाच्या सहसंचालकांनी कळविले आहे.
बेळगावसह उत्तर कर्नाटकात गुंतवणुकीला पोषक वातावरण असून विकासालाही वाव आहे. त्यासाठी गुंतवणूक वाढविण्याचा विचार असून त्याचाच भाग म्हणून पुढील महिन्यात बेळगावात उद्योजकांची बैठक होणार आहे. बैठकीत गुंतवणूक वाढली वाढविण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.