Friday, May 3, 2024

/

पारंपरिक पद्धतीने दसरा उत्सवासाठी परवानगी देण्याची मागणी

 belgaum

पारंपारिक महत्त्व लक्षात घेऊन आगामी दसरा उत्सव म्हणजे विजयादशमी -सीमोल्लंघनाचा कालावधी वाढवून देण्याबरोबरच प्रत्येकी 50 भक्तांसह शहरातील सर्व पालख्यांच्या मिरवणुकीना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आज सोमवारी जिल्हाधिकार्‍यांशी झालेल्या बेळगाव शहर देवस्थान कमिटी, चव्हाट गल्ली देवदादा सासन काठी कमिटी आणि कॅम्प दसरा उत्सव कमिटीच्या बैठकीत करण्यात आली.

आगामी दसरा उत्सव पारंपारिक पद्धतीने पालखी मिरवणूक आणि सीमोल्लंघन कार्यक्रमाने साजरा करण्यास परवानगी मिळावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. सदर बैठकीस बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहर देवस्थान कमिटी चव्हाट गल्ली देवदादा सासनकाठी कमिटी तसेच कॅम्प येथील दसरा उत्सव कमिटीचे पदाधिकारी आणि निवडक सदस्य उपस्थित होते. या सर्वांच्यावतीने बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगावच्या दसरा उत्सवाला एक हजार वर्षांपूर्वीपासूनची परंपरा असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सांगितले.

त्या परंपरेनुसार कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करून गेल्या वर्षी दसरा उत्सव साजरा करण्यात आला होता. त्याचप्रमाणे यावर्षीही केला जाईल. मात्र यावेळी पालखीसोबत 50 भक्तांना जाण्यास परवानगी द्यावी. त्याच प्रमाणे गेल्यावर्षी शहर देवस्थान कमिटी आणि चव्हाट गल्ली देवदास सासनकाठी कमिटी यांना पालखी मिरवणुकीची परवानगी देण्यात आली होती. यावेळी सीमोल्लंघना दिवशी सदर दोन्ही पालख्यासह शहरातील मारुती गल्ली, बसवान गल्ली, गोंधळी गल्ली आदी गल्ल्यांमधील पारंपारिक पालख्यांना परवानगी देण्यात यावी.Dassera permission

 belgaum

तसेच सिमोल्लंघन कार्यक्रमाचा कालावधी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवून द्यावा. शहराप्रमाणे कॅम्प येथील विजयादशमी कार्यक्रम रथोत्सवाचा कालावधी सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाढवून देण्यात यावा, अशी विनंती आमदार ॲड. अनिल बेनके यांनी जिल्हाधिकार्‍यांना केली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आमदार बेनके यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्या आणि विनंती संदर्भात सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी चव्हाट गल्ली देवदादा सासनकाठी कमिटीचे लक्ष्मण किल्लेकर, सुनील जाधव, श्रीनाथ पवार, शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, रमाकांत कोंडुसकर, परशराम माळी आदींसह कॅम्प येथील दसरा उत्सव कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

उपरोक्त सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन आणि पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडेही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीप्रमाणे मागणी करून विजयादशमी सीमोल्लंघन कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.