गिर्यारोहणात आघाडीवर असलेल्या शहरातील सुप्रसिद्ध ‘बेळगाव ट्रेकर्स ग्रुप’ या युवा गिर्यारोहकांच्या समूहाने महाराष्ट्रातील सर्वात कठीण चढाई असलेले भैरवगड आणि हरिश्चंद्र गड हे दुर्गम दुर्ग नुकतेच सर केले आहेत.
बेळगांव ट्रेकर्स ग्रुप या बेळगावातील गिर्यारोहकांच्या (ट्रेकर्स) समूहाने महाराष्ट्रातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या भैरवगड आणि हरिश्चंद्र गड या गिरीदुर्गांची यशस्वी चढाई केली आहे. या गिर्यारोहन मोहिमेचे आयोजन गेल्या शनिवारी व रविवारी करण्यात आले होते.
भैरवगड हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येतो. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 4997 फुट इतकी आहे. या किल्ल्याचा शेवटचा टप्पा इतका कठीण आहे की गिर्यारोहकांना रॅपलिंग तंत्राचा अवलंब करावा लागतो.
बेळगाव ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य प्रथम भैरवगड पादक्रांत केल्यानंतर रविवारी पहाटे 5 वाजता हरिश्चंद्रगड पदभ्रमंती करून हरिहरेश्वर मंदिराच्या प्रांगणात सकाळी 8 वाजता पोहचले. त्यासोबतच हरिश्चंद्रगडावर असणाऱ्या तारामती या महाराष्ट्रातील 4 थ्या क्रमांकाच्या शिखराची चढाई देखील या समूहाने केली. तसेच कोंकण कड्याचा इतिहास देखील जाणून घेतला.
हरिश्चंद्रगड हा दुर्ग नगर जिल्यातील माळशेज घाट रांगेमध्ये येतो. या गडावरील शिवकालीन किल्ला समुद्रसपाटीपासून 4665 फुट उंचीवर आहे. सदर गिर्यारोहन मोहिमेमध्ये आकाश पावशे, राहुल कडेमनी, ओमकार पावशे, निखिल पाटील, राजन आनंदाचे, सूरज आपटेकर, श्री कुलकर्णी आणि बसवराज कोंडसकोप यांचा सहभाग होता. भैरवगड आणि हरिश्चंद्र गडाची गिर्यारोहन मोहीम यशस्वी केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.