सालाबादप्रमाणे आर्ट्स सर्कल तर्फे दिवाळी पहाटेच्या गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटे ६ वाजता श्रीमती पूर्णिमा भट कुलकर्णी, (बेंगळूरु) यांच्या गायनाचा कार्यक्रम आर् पी डी कॉलेजच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तबला आणि संवादिनी साथ अनुक्रमे अंगद देसाई आणि रवींद्र माने हे करतील. सदर कार्यक्रमाला सर्व रसिकांना मुक्त प्रवेश आहे असे अध्यक्षा लता कित्तूर कळवितात.
कलाकारांचा परिचय
मुळच्या धारवाडच्या असलेल्या पूर्णिमा भट यांनी आपले गायनाचे सुरुवातीचे शिक्षण श्रीमती उषा दातार यांच्याकडे घेतले. त्यानंतर त्यांना पं बसवराज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. याशिवाय, त्यांनी पं. वसंत कनकापूर, श्रीमती कुसुम शेंडे, श्रीमती उषा चिप्पलकट्टी आणि पं. मुरली मनोहर शुक्ला यांचे मार्गदर्शन देखील घेतले आहे.
संगीत हा विषय घेऊन त्यांनी कला शाखेच्या स्नातकोत्तर पदवी मिळविलेली आहे आणि सुवर्ण पदकाच्या मानकरी आहेत. कर्नाटक सरकारचा राज्यस्तरीय बहुमान त्यांना मिळालेला आहे.
त्यांना आकाशवाणीची ‘अ’ श्रेणी शास्त्रीय आणि सुगम गायनाच्या कार्यक्रमांसाठी मिळालेली आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच त्या ठुमरी, कजरी, चैती, झूला, मराठी अभंग, भावगीते, नाट्यगीते, कन्नड भजने आणि वचने त्या उत्तम रीतीने सादर करतात.
निकोप आवाजाची देणगी लाभलेल्या पूर्णिमा ह्यांचे कार्यक्रम कर्नाटक, महाराष्ट्रात, गोवा, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश, याशिवाय अबु धाबी, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को आदी ठिकाणी झालेले आहेत. संगीत नाटक ॲकॅडमीने त्यांच्यावर एक माहितीपट प्रदर्शित केलेला आहे. त्यांची काही ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत. विद्यादानाचे त्यांचे कार्य देखील कौतुकास्पद आहे.
त्यांना तबला आणि संवादिनीवर अनुक्रमे श्री. अंगद देसाई आणि श्री. रवींद्र माने हे साथ करणार आहेत.
अंगद देसाई हे तंत्रज्ञानाचे स्नातक पदवीधर आहेत. लहानपणापासून त्यांना तबल्याची आवड आहे आणि त्यांनी तबल्याचे शिक्षण पं. बंडोपंत कुलकर्णी आणि पं. संतोष कुलकर्णी यांच्याकडे घेतले. सध्या पं. कल्याणराव देशपांडे यांच्याकडे त्यांचे तबल्याचे शिक्षण सुरू आहे. अनेक गायक वादकांची तबला साथ त्यांनी समर्थपणे केलेली आहे. देशविदेशात अनेक ठिकाणी त्यांच्या तबला एकल वादनाचे कार्यक्रम झालेले आहेत.
व्यवसायाने वकील असलेले रवींद्र माने हे लहानपणापासून संवादिनी वादनाकडे आकर्षित झाले. त्यांनी पं. रामभाऊ विजापुरे यांच्याकडे संवादिनी वादनाचे शिक्षण घेतले आहे. अनेक गायकांची संवादिनी साथ त्यांनी केलेली आहे आणि अनेक ठिकाणी त्यांच्या संवादिनी एकल वादनाचे कार्यक्रम झालेले आहेत.