तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट थलाईवी चे विशेष स्क्रिनिंग दिल्लीत करण्यात आले.
वादग्रस्त आणि नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हीच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट असून त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगची जबाबदारी बेळगावच्या युवकाने स्वीकारली होती. दिल्लीत झालेल्या या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बेळगावच्या युवकाचा हातभार लागला.
केळकर बाग येथील अभिषेक जाधव यांच्या रनिंग मेट या कंपनीने या चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित केले होते. बेळगावचे युवक कोठेही कमी नाहीत .सध्या इव्हेंट ऑर्गनायझिंग करण्यात बेळगावच्या युवकांनी मोठा पुढाकार घेतला आहे.
झी स्टुडिओजशी संलग्न असलेल्या अभिषेक दत्ता जाधव या केळकर बाग येथील युवकाने या चित्रपटाचे स्क्रिनिंग करून यश मिळवले आहे. त्या कार्यक्रमाला लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक सदस्य उपस्थित होते.
बेळगावचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वतः अभिनेत्री कंगना राणावत खासदार अरविंद शर्मा ,खासदार संध्या रे , अशोक वाजपेयी, विवेक शेजवळकर, ब्रिज भूषण शरण सिंग, रमेश बिधुरी आणि भाजपचे दिल्ली अध्यक्ष आदेश गुप्ता हे मान्यवर उपस्थित होते.
या चित्रपटात जयललितांच्या भूमिकेत कंगना राणावत असून प्रसिद्ध अभिनेते अरविंद स्वामी हेही प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे तर विशेष स्क्रीनिंगला बेळगावच्या युवकाचा हातभार लागल्यामुळे बेळगाव आणि परिसरात या चित्रपटाची वेगळीच चर्चा होणार आहे.