बेळगाव रेल्वे यार्डमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे बेळगाव -शेडबाळ -बेळगाव पॅसेंजर रेल्वे गुरुवार दि. 16 सप्टेंबरपर्यंत धावणार नसल्याची माहिती हुबळी विभागाचे डीआरएम अरविंद मालखेडे यांनी दिली आहे.
हुबळी ते मिरज या दरम्यानच्या पॅसेंजर मागील कांही महिन्यांपासून कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर बेळगाव -शेडबाळ -बेळगाव ही पॅसेंजर सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे कांही प्रमाणात का होईना प्रवाशांची सोय झाली होती.
तथापि आता बेळगाव रेल्वे यार्डमधील दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या 30 ऑगस्टपासून ही पॅसेंजर दखील रद्द करण्यात आली असून 16 सप्टेंबरपर्यंत ती धावणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही रेल्वे रद्द झाल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून प्रवाशांचे हाल होत आहेत.
पॅसेंजर रेल्वे उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना जादा तिकीट दर देऊन एक्सप्रेसने प्रवास करण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी नैऋत्य रेल्वेने बेळगावमधून दोन पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत विचार केला होता.
मात्र अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तरी प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन संबंधित पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.