belgaum

पाईपलाईन रोड, रक्षक कॉलनी पहिला क्राॅस विजयनगर, येथील हिंडलगा ग्रा.पं. सदस्य राहुल उरणकर यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरामध्ये साकारलेला ‘भक्त कुंभार’ हा पर्यावरण पूरक देखावा सध्या गणेश भक्तांची मनं जिंकून घेत आहे.

सलग दुसऱ्यांदा हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले राहुल रवींद्र उरणकर आणि त्यांचे कुटुंबीय श्रीगणेशाचे निस्सीम भक्त आहेत. गणेशोत्सवात दरवर्षी आपल्या घरी श्री गणेश प्रतिष्ठापना करताना राहुल हे लक्षवेधी देखावे सादर करत असतात. त्यांनी सादर केलेले देखावे पर्यावरण पूरक असतात हे विशेष होय. यंदाही त्यांनी ‘भक्त कुंभार’ हा देखावा सादर केला आहे, जो सर्वांचे आकर्षण ठरत आहे. सदर देखावा साकारण्यासाठी राहुल उरणकर यांनी तीन दिवस परिश्रम घेतले आहेत.

bg

‘भक्त कुंभार’ देखावा सादर करताना संपूर्णपणे पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये कोठेही पीओपी अथवा प्लास्टिक वगैरेचा वापर करण्यात आलेला नाही. देखाव्यासाठी जुन्या काळातील झोपडीप्रमाणे गवताचे छत असलेली तट्टाची झोपडी उभारण्यात आली आहे. जमिनीसह संपूर्ण झोपडी गायीच्या शेणाने सारवण्यात आली आहे. झोपडीच्या मध्यभागी छताला पेटता कंदील टांगण्यात आला असून एका कोपऱ्यात रॉकेलची चिमणी ठेवण्यात आली आहे.Hindlga ganesha

भक्त कुंभाराच्या रूपातील श्री गणेश मध्यभागी चाकावर मातीची भांडी बनवत आहेत, तर डाव्या बाजूला गणेशाचे वाहन मूषक चिखल तुडवताना दाखविला आहे. त्याचप्रमाणे उजवीकडे पाणी येत असलेला नळ असून एक मूषक नळाजवळ हंड्यात पाणी भरताना दाखविण्यात आला आहे. संपूर्णपणे पर्यावरण पूरक असणाऱ्या या देखाव्यासाठी कंदील, चिमणी आणि समईंच्या मदतीने प्रभावी प्रकाशयोजना करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी सदर देखावा अत्यंत विलोभनीय आणि वास्तवपूर्ण वाटतो. देखाव्यातील श्री गणेश मूर्ती राजू मोहिते या मूर्तिकारांनी बनविली असून ती संपूर्णपणे शाडूची आहे.

राहुल उरणकर हे दरवर्षी गणेशोत्सवामध्ये या पद्धतीने आपल्या घरी आकर्षक श्री मूर्तीची प्रतिष्ठापना करून लक्षवेधी देखावे सादर करत असतात. यापूर्वी त्यांच्या मूर्ती व देखाव्यांना अनेक बक्षिसेही मिळाली आहेत.

प्रामुख्याने मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने 2018 साली घेतलेल्या विधायक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत उरणकर यांच्या श्री मूर्तीला उत्कृष्ट मूर्तीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2019 मध्ये लोकमान्य सोसायटीने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत त्यांच्या मूर्ती व देखाव्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते.

याचवर्षी युनायटेड बेळगाव संस्थेच्या स्पर्धेतही त्यांना उत्कृष्ट मूर्ती व देखाव्याचा पहिला क्रमांक मिळाला होता. यंदा राहुल उरणकर यांनी सादर केलेला भक्त कुंभाराचा पर्यावरण पुरक देखावा देखील सर्वांची मने जिंकताना दिसत असून देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.