बेळगाव शहरातील विविध व्यापारी संकुलं मधील 113 दुकान गाळ्यांसह कत्तलखाना व बकरी शेडचा लिलाव करण्याचा निर्णय बेळगाव महापालिकेने घेतला असून येत्या 7 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
शहरातील विविध व्यापारी संकुलात मधील 113 दुकान गाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याआधी झालेल्या लिलाव प्रक्रियेत ज्या दुकान गाळ्यांना बोली लागली नव्हती, अशा गाळ्यांचा लिलाव या वेळी होणार आहे. याशिवाय मागील वेळी झालेल्या लिलाव प्रक्रियेत ज्या 66 जणांनी गाळे भाडेकराराने घेतले होते व नियमानुसार शिल्लक अनामत रक्कम व चार महिन्याची भाडे रक्कम भरली नव्हती, त्या गाळ्यांचाही लिलाव होणार आहे.
त्याचप्रमाणे नव्याने बांधण्यात आलेल्या 13 गाळ्यांचा देखील लिलाव होईल. हे 113 दुकान गाळे लिलावाच्या माध्यमातून भाडेकराराने देण्याचा निर्णय महापालिकेने गेल्या 19 जुलै रोजी घेतला होता.
महापालिकेच्या दुकान गाळ्यांचा लिलाव 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होईल. पहिल्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी नेहरूनगर येथील स्मार्ट रोडवरील दुकान गाळ्यांजवळ लिलाव होईल. या वेळी स्मार्ट रोडवरील दुकान गाळे तसेच आरपीडी क्रॉस, अशोक चौक, डॉ. आंबेडकर उद्यान, केएलई हॉस्पिटल, गोगटे सर्कल, गोवावेस, चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, दुसरे रेल्वे गेट येथील फूड किओस्कचा लिलाव होणार आहे. तसेच आठ ऑक्टोबर रोजी खासबाग व अनगोळ नाका येथील दुकान गाड्यांचा लिलाव होईल.
त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी जुना धारवाड रोड, कसाई गल्लीतील मासळी बाजार, कसाई गल्लीतील कत्तलखाना व बकरी शेड तसेच कोनवाळ गल्लीतील कत्तलखाना व बकरी शेडचा लिलाव होणार आहे. महात्मा फुले भाजी मार्केटमधील दुकान गाळ्यांचा लिलाव 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे सरदार्स मैदान व जुन्या महापालिका कार्यालय आवारातील दुकान गाळ्यांचा लिलाव 13 ऑक्टोबर रोजी होईल.
नूतन आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांच्याशी चर्चा करून महसूल विभागाने या लिलाव प्रक्रियेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून महापालिकेला दरमहा चांगले महसूली उत्पन्न मिळणार आहे. याआधी गेल्या जानेवारी महिन्यात महापालिकेने लिलाव प्रक्रिया राबविली होती.