बेळगाव महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गौरी -गणपती विसर्जनासाठी बेळगाव शहरात यंदा 29 फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गौरी -गणपतीचे आज मंगळवारी विसर्जन होणार असून यासाठी सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत हे विसर्जन कुंड उपलब्ध असणार आहेत.
महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या विसर्जन कुंडांची यादी जाहीर करण्यात आली असून भाविकांनी आपल्याकडील गणेश मूर्तींचे विसर्जन त्या कुंडात करावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमात कॅन्टोन्मेंट बोर्ड व बुडा यांचाही सहभाग असणार आहे. शहरात सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या मालकीचे तलाव आहेत.
त्या तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. तथापि पीओपी व रंगांमुळे तलावाचे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी दरवर्षी फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून दिले जातात. उपनगरांमध्येही गणेशमूर्ती विसर्जनासाठी तलाव किंवा विहीर नाहीत अशा ठिकाणी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो, असे महापालिकेचे मत आहे.
महापालिकेचे विसर्जन कुंड पुढील भागात उपलब्ध असणार आहेत. भाग्यनगर पाचवा क्रॉस, गणेश चौक पहिले रेल्वे गेट टिळकवाडी, जुना धारवाड रोडवरील धाकोजी हॉस्पिटलजवळ, बसवेश्वर सर्कल खासबाग, सुभाष मार्केट हिंदवाडी, विश्वेश्वरय्यानगर बसथांबा, रामलिंग खिंड गल्लीतील टिळक चौक, कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर मार्ग, देवराज अर्स कॉलनी, हिंडलग्यातील झोपडपट्टी सुधारणा मंडळ कार्यालय व सह्याद्री नगरातील पाण्याची टाकी.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विसर्जन कुंड : रामतीर्थनगर शिवालय, स्टेट बँक ऑफ म्हैसूर महांतेशनगर, बॉक्साईट रोडवरील नागलोतीमठ यांचे निवासस्थान, हनुमाननगर चौक, एसबीआय बँक चन्नम्मानगर, हॅक्सीनडेपो, श्रीनगर उद्यानानजीक, साईबाबा मंदिर वंटमुरी, शाहूनगर अखेरचा बसस्टॉप व हरीमंदिर अनगोळ. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विसर्जन कुंड : किल्ला परिसर, कॅम्प पोलिस ठाणे, लक्ष्मी टेकडी लक्ष्मी देवस्थान, इस्लामिया हायस्कूल व जुने टपाल कार्यालय. बुडाचे विसर्जन कुंड : रामतीर्थनगर शिवालय, कुमारस्वामी लेआउट व ऑटोनगर.