श्री गणेशोत्सव काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांची गैरसोय टाळण्यासाठी वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने या काळात विविध मार्गांवर अतिरिक्त 50 बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
श्री गणेश उत्सवासाठी गावाकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असते. जिल्ह्यातील अनेक जण कामासाठी गोवा व महाराष्ट्र राज्यात असतात. ते सणासाठी गावी परतत असल्याने प्रवाशांची संख्या वाढलेली असते.
यात भर म्हणजे आज शुक्रवारी गणेश चतुर्थी, उद्या शनिवारी दुसरा शनिवार तर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे कांही नोकरदारांना सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. परिणामी सणासाठी अनेक जण परगावी जाणारे असतात हे लक्षात घेऊन या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन मंडळाच्या ज्यादा 50 बसेस विविध मार्गावर धावणार आहेत.
तोरणा प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात परिवहन मंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. सदर नुकसान भरून काढण्यासाठी परिवहन मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून विविध मार्गांवर अतिरिक्त 50 बसेस सोडून महसूल वाढविण्याच्या प्रयत्न केला जाणार आहे. श्री गणेशोत्सव काळात परिवहन मंडळाकडून जिल्ह्यांतर्गत बससेवेबरोबरच गोवा राज्यात ही अतिरिक्त बस धावणार आहेत.
बेंगलोर, म्हैसूर, दावणगिरी, गदग, हावेरी, चिक्कोडी, बागलकोट यासह गोवा राज्यात जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर परिवहन मंडळाने ऑनलाईन बुकिंग व्यवस्था केली असून ksrtc.karnataka.gov.in या वेबसाईटवर बस तिकीट बुकींग करता येणार आहे. याखेरीज बसस्थानकावर आगाऊ बुकिंगची व्यवस्था करण्यात आली असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.