बेळगाव महापालिकेची निवडणूक अपारदर्शी झाली असल्याचा आरोप करून या निवडणुकीच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आली असून मुख्य निवडणूक आयुक्तांनी या तक्रारीची नोंद घेतली आहे.
बेळगावच्या पियुष हावळ यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बेळगाव महापालिका निवडणुकीच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेण्यात आली असल्याची पोचपावती देणारे पत्र हावळ यांना आले आहे.
बेळगाव महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार घडले असून निवडणूक पारदर्शी झालेली नाही. तेंव्हा या संदर्भात सखोल चौकशी करण्याबरोबरच ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी. तसेच नव्याने मुक्त वातावरणात निःपक्षपाती निवडणूक घेतली जावी, अशी तक्रार वजा मागणी पियुष हावळ यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दरम्यान, नुकताच पार पडलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत प्रक्रियेबद्दल जनमानसात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत सदर निवडणूक प्रक्रियेद्वारे अनेक मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यात आला आहे. तांत्रिक दृष्ट्या देखील सदर निवडणूक सदोष झाली असल्याचा आरोप केला जात आहे.
यासंदर्भात निवडणूक रिंगणातील पराभूत उमेदवारांनी आवाज उठविण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचे आणि निवडणूक आयोगाची दरवाजे ठोठावण्याची तयारी केली जात आहे. एकंदर परिस्थिती पाहता निवडुन आलेल्या उमेदवारांची नगरसेवक म्हणून अधिकृत घोषणा होती की नाही? याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
या अगोदर हावळ यांनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार करत बेळगाव मनपा निवडणुक पारदर्शक झाली नसल्याच म्हटलं होतं.