बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रभागातून उमेदवार निवडून आले असले तरी त्यांची राजपत्रात नगरसेवक म्हणून नोंद झालेली नाही. विजयी उमेदवारांनी महापालिका यंत्रणा हाताळण्यास सुरुवात करण्यासाठी आता अधिकृत नोंदींचीच प्रतीक्षा आहे.
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. सदर निवडणुकीचा निकाल घोषित झाला असला तरी विजयी उमेदवारांची अद्यापही राजपत्रात (गॅझेट) नोंद झालेली नसल्यामुळे त्यांना नगरसेवक म्हणून अधिकृत दर्जा मिळालेला नाही.
लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्यानुसार लोकांनी निवडून दिलेल्या उमेदवाराच्या नांवाची प्रथम राजपत्रात नोंद होते. पुढे रीतसर शपथविधीनंतर संबंधित लोकप्रतिनिधीला अधिकृतपणे आपल्या कामाला प्रारंभ करता येतो. सदर लोकप्रतिनिधी मग आपल्या अधिकारानुसार शासकीय यंत्रणेत हस्तक्षेप करू शकतो.
बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये विजय झालेल्या 58 प्रभागांच्या उमेदवारांच्या बाबतीत अद्यापही उपरोक्त प्रक्रिया पार पडलेली नाही. या सर्वांना अद्याप नगरसेवक म्हणून अधिकृत दर्जा मिळावयाचा आहे.
आपल्या प्रभागात पाहणी दौरा काढणे, स्वच्छता मोहीम राबविणे वगैरे सामाजिक सेवा कामे करण्यास संबंधित विजयी उमेदवारांकडून सुरू झाले आहेत. हे करताना या मंडळींनी आपल्या प्रभागातील महापालिकेचे अधिकारी, पर्यवेक्षक, कामगार आदींकडून मार्गदर्शन घेऊन कामास सुरुवात केली आहे.