येळ्ळूर गावात स्वागत कमानी उभारणाच्या कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकारच्या अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली असून चर्चेअंती येळ्ळूर गावच्या अस्मितेला डिवचू नका, असे आवाहन कर्नाटक सरकारला करण्यात आले आहे.
कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकारच्या अध्यक्ष डाॅ. सी. सोमशेखर यांनी आपल्या बेळगाव दौऱ्याप्रसंगी बोलताना येळ्ळूरमध्ये परराज्यातील लोक येत असल्यामुळे त्यांना येळ्ळूर गाव कर्नाटकचे आहे हे समजले पाहिजे म्हणून गावात तीन-चार ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. जिल्हाधिकार्यांना तशी सूचना देण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मोठा वादंग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येळ्ळूर ग्रामपंचायतीसह समस्त येळ्ळूरवासियांनी यासंदर्भात बैठक घेऊन डॉ. सोमशेखर यांनी घेतलेल्या स्वागत कमानी उभारण्याच्या निर्णयाचा निषेध केला असून याबाबत लवकरच पुढची रणनिती ठरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
सीमा लढ्याचा केंद्रबिंदू असणाऱ्या येळ्ळूर या गावाने बेळगावसह सीमाभागात मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. सीमाप्रश्न ज्या वेळी निर्माण झाला. त्या 1965 साली येळ्ळूर गावाच्या वेशीवर ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ असा फलक लावून येळ्ळूरवासियांनी महाराष्ट्र जाण्याची आपली तीव्र भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर यांनी येळ्ळूर गावात तीन ते चार स्वागत कमानी उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मराठी माणसाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात असून कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाला आत्ताच का सीमाभागाचा विकास आठवला? याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे अनेकदा प्रयत्न करून देखील येळ्ळूर गावचे मराठी पण पुसता येत नसल्यामुळे आता स्वागत कमानी उभारून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र समस्त मराठी भाषिक आपला मराठी बाणा कायम ठेवण्यासाठी जिवाचे रान करतील, अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
येळ्ळूर गाव बासमती तांदळासाठी प्रसिद्ध असून गावात शिक्षक, जवान व गवंडी कामगार बहुसंख्येने आहेत. या गावात दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरून मराठीचा जागर केला जातो. गावात दोन सरकारी मराठी प्राथमिक शाळा व दोन माध्यमिक शाळा असून हे गाव पूर्णपणे मराठी बहुभाषिक आहे. 1965 पासून गावाच्या वेशीवर असणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविण्यात आला. त्यावेळी येळ्ळूरवासियांनी फलक हटवू नये यासाठी तीव्र विरोध दर्शविला. मात्र मराठी भाषिकांवर अन्याय करून हा फलक हटविण्यात आला आणि त्याचे पडसाद त्यानंतर अनेक दिवस उमटत राहिले होते. त्याचीच पुनरावृत्ती स्वागत कमानींच्या बाबतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.