उडपी आणि हावेरी जिल्हा पुरती मर्यादित असणारी मुलांसाठीची राज्य सरकारची ‘वात्सल्य’ योजना आता बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मुलांमध्ये अधिक प्रमाणात पसरण्याचा धोका तज्ञांनी वर्तवल्यामुळे आरोग्य खात्यासह प्रशासन जागे झाले असून विशेष खबरदारी म्हणून वात्सल्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शाळा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात बालके व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
याखेरीज आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. कुपोषित बालके किंवा कोणताही आजार असल्याचे आढळून आल्यास अशा बालकांवर उपचार करण्याची तसेच कुपोषित बालकांना पौष्टीक अन्न पुरवण्याची व्यवस्था या योजनेअंतर्गत केली जाणार आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण खाते महिला व बाल कल्याण खाते शिक्षण खाते आणि महसूल खाते यांच्या समन्वयातून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
बालकांमध्ये गंभीर स्वरूपाचे आग्रह आजार आढळून आल्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याची सोय ‘वात्सल्य’ योजनेअंतर्गत असणार आहे.
बालक आणि मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास ते कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास त्यांच्या जिवास कोणताही धोका निर्माण होऊ नये या दृष्टीने उपाय योजना हाती घेण्यात येणार आहेत. वात्सल्य योजना अंमलबजावणीची प्रमुख जबाबदारी आरोग्य खात्यावर राहणार आहे.