कर्नाटक मंत्रिमंडळाने येत्या 13 ते 23 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये बेंगलोर विधानसौध येथे 10 दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे साहजिकच पुन्हा एकदा विधानसभा अधिवेशन बेळगाव सुवर्ण सौध ऐवजी बेंगलोर येथे घेतले जात आहे.
बेळगावची राजेशाही सुवर्ण विधानसौध इमारत सध्या कांही सरकारी कार्यालयांसह कार्यरत असून 2019 सालची पूर परिस्थिती आणि 2020 मधील कोरोना प्रादुर्भाव यामुळे येथे विधानसभा अधिवेशन होऊ शकलेले नाही.
अलीकडे सर्वात शेवटी 2018 साली या ठिकाणी विधिमंडळाचे 10 दिवसांचे हिवाळी अधिवेशन घेण्यात आले होते. या अधिवेशनासाठी 13.85 कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आल्याचे आरटीआय कार्यकर्ता भिमाप्पा गडाद यांनी स्पष्ट केले होते.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आतापर्यंत झालेल्या सरकारच्या अधिवेशनसाठी आलेला खर्च पुढील प्रमाणे आहे. 2013 साली 8 कोटी रुपये, 2014 साली 14 कोटी रुपये, 2015 साली 13 कोटी रुपये, 2016 साली 16 कोटी रुपये, 2017 साली 31 कोटी रुपये आणि 2018 साली 13.85 कोटी रुपये.