Friday, May 3, 2024

/

बेळगावात आहे विशेष पोलिस वस्तुसंग्रहालय : काय आहे या ठिकाणी?

 belgaum

देशामध्ये कर्नाटक पोलीस दलाचा आपला असा वेगळा इतिहास आहे. अनेक आव्हानात्मक प्रकरणांचा यशस्वी छडा लावून कर्नाटक पोलिसांनी सातत्याने आपल्या तपास कार्यात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. बेळगावचे 50 वर्षांपूर्वीचे पोलीस खाते आणि आत्ताचे पोलीस खाते यात जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे.

पूर्वी दंगा -हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी आणि गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी पोलिसांकडून वापरली जाणारी साहित्य -उपकरणे, त्यांचा गणवेश, तत्कालीन पोलीस वाद्यवृंदाचा पोशाख आदींबाबत सर्वांनाच कुतूहल असते. याव्यतिरिक्त पोलीस खात्याचा इतिहास व अन्य उद्बोधक माहिती सर्वसामान्यांना मिळावी यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने बेळगाव पोलीस हेडकॉटर्स येथे विशेष पोलीस वस्तू संग्रहालयाची उभारणी केली आहे.

अपराध आणि दंगा -हिंसाचार रोखण्यासाठी पूर्वीचे कर्नाटक पोलिस वापरत असलेले साहित्य -उपकरणे, सुरक्षाकवच, पोलीस हॅट, निष्क्रिय ग्रेनेड, वेताची लाठी, जॅकेट, हेल्मेट, पूर्वीच्या पोलीस वाद्यवृंदातकडून वापरली जाणारी वाद्ये, त्यांचा पोशाख, मेटल डिटेक्टर, तत्कालीन पोलिसांकडून वापरले जाणारे एफएसएल आणि इन्व्हेस्टिगेशन किट, 1972 मध्ये अस्तित्वात असलेली मूव्हींग रिपेरी व्हेईकल वगैरे असंख्य साधन, उपकरण, पोशाख या वस्तुसंग्रहालयात मांडण्यात आले आहेत. राज्याचे डीजेपी प्रवीण सूद यांच्या हस्ते या विशेष पोलीस वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन झाले आहे.Police

 belgaum

बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या कल्पनेतून हे पोलीस वस्तुसंग्रहालय साकारले आहे. यासाठी त्यांनी बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संग्रहालय स्थापन केले आहे.

यासंदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी म्हणाले की, बेळगाव हा अतिशय जुना जिल्हा आहे. ब्रिटिशांच्या काळात बेळगाव जिल्हा केंद्र स्थळ होते. येथील पोलिस दलाला 120 वर्षाचा इतिहास आहे. तो पूर्वीचा इतिहास आणि सध्याचे वास्तव. गेल्या 120 वर्षात येथील पोलिस दलात झालेले बदल या सर्वांची माहिती लोकांना मिळावी यासाठीचा हा छोटा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे हे पोलीस वस्तुसंग्रहालय भावी पोलीस प्रशिक्षणार्थींसाठी फायदेशीर ठरू शकते, असे निंबरगी यांनी सांगितले.

सदर पोलीस वस्तू संग्रहालयामध्ये 1972 सालच्या कालावधीत रस्त्यावर बंद पडलेल्या पोलीस वाहनांच्या युद्ध पातळीवरील दुरुस्तीसाठी वापरली जाणारी मूव्हींग रिपेरी बस देखील ठेवण्यात आली आहे.

हे वस्तुसंग्रहालय सार्वजनिकांसाठी खुले करण्याबाबत पुढील कांही दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे आता शाळा सुरू होत आहेत, त्यामुळे शालेय मुलांच्या शैक्षणिक सहलीसाठी हे संग्रहालय खुले करण्याचा विचारही केला जात आहे, असेही जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.