मराठी भाषिकांच्या वाढत्या मागणीमुळे बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी कन्नड बरोबरच आता मराठी भाषेतील उमेदवारी अर्ज आज गुरुवारपासून उपलब्ध होणार आहेत. यासाठी महापालिकेने 3000 उमेदवारी अर्जांची छपाई करून घेतली आहे.
समस्त मराठी भाषिकांची मागणी आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आज चौथ्या दिवशी मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेतील अर्ज उपलब्ध होणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली जात होती. याची दखल घेऊन महापालिकेने गेल्या मंगळवारी कन्नड भाषेतील उमेदवारी अर्जांचे मराठीमध्ये भाषांतर करून छपाईसाठी मुद्रकाकडे दिले होते.
शहरातील मराठी भाषिकांची संख्या लक्षात घेऊन 3000 उमेदवारी अर्जांची छपाई करण्याची सूचना मुद्रक आला देण्यात आली. होती. त्यानुसार मुद्रकाने काल बुधवारी सायंकाळी ऑर्डर पूर्ण केल्यामुळे आज गुरुवारपासून मराठी भाषेतील उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी भाषिकांच्यावतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषेतील उमेदवारी अर्ज मिळावा यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करून पाठपुरावा सुरू ठेवला होता. यासंदर्भात समिती नेत्यांनी काल बुधवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन पुन्हा निवेदन दिले होते मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बजावलेल्या आदेशाची प्रतही जिल्हाधिकार्यांना देण्यात आली होती.
तथापि ‘मी यापूर्वीच महापालिकेला सूचना केली आहे, तेव्हा लवकरच मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध केले जातील’, असे आश्वासन काल जिल्हाधिकार्यांनी दिले होते. आता उमेदवारी अर्ज मराठीत उपलब्ध होणार असल्याने मराठी भाषिक इच्छुकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.